कराड पंचायत समितीच्या नवीन इमारत प्रस्तावाचे काय झालं?; देवराज पाटील यांचा सवाल

इमारतीचा आराखडा तयार नसल्याने त्याबाबतचा पाठपुरवा करण्यास अडचण येत असल्याचे सांगत पंचायत समिती सदस्य देवराज पाटील यांनी पंचायत समितीच्या प्रस्तावाचे काय झाले असा प्रश्न उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यास धारेवर धरले.

  कराड : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कराड पंचायत समितीच्या (Karad Panchayat Samiti) नवीन इमारतीसाठीच्या निधीबाबत चौकशी केली आहे. अजून इमारतीचा आराखडा तयार नसल्याने त्याबाबतचा पाठपुरवा करण्यास अडचण येत असल्याचे सांगत पंचायत समिती सदस्य देवराज पाटील यांनी पंचायत समितीच्या प्रस्तावाचे काय झाले असा प्रश्न उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यास धारेवर धरले. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती प्रणव ताटे होते. तर उपसभापती रमेश देशमुख व गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे होते.

  स्व. यशवंतराव चव्हाण बचत भवन येथे कराड पंचायत समितीची मासिक सभा पार पडली. यावेळी, आरोग्य, वीज वितरण, ग्रामपंचायत प्रशासन आदी विभाग सदस्यांच्या रडारवर राहिले.

  ओंड उपकेंद्रातील रिक्त पदे भरा; अन्यथा उपोषण…

  तालुक्यातील ओंड आरोग्य उपकेंद्र दोन वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही आरोग्य दुर्लक्ष केले जात आहे. कोरोनाकाळात उपचाराअभावी लोकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रिक्त पदे भरणार नसाल तर आरोग्य उपकेंद्र निर्लक्षित करा, अन्यथा याप्रश्नी आम्ही उपोषणास बसू, असा इशारा पंचायत समिती सदस्य शरद पोळ यांंनी दिला. दरम्यान, सभापती ताटे यांनी या प्रकरणी जिल्हा परिषद तसेच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार केल्याची माहिती दिली.

  वारूंजीला उपकेंद्र मंजूर करा : नामदेव पाटील

  विजयनगर गावची लोकसंख्या एक हजार असून, वारुंजी गावची लोकसंख्या सहा हजारांपेक्षा जास्त आहे. असे असतानाही वारुंजीऐवजी विजयनगरला आरोग्य उपकेंद्र कसे काय मंजूर केले? तसा ठराव कोणी केला? असा प्रश्न पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांनी उपस्थित केला. तसेच मुंंढे आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्र मंजूर करावे, अशी मागणीही पाटील यांनी केली.

  ग्रामपंचायत प्रशासन गतिमान करा

  ग्रामपंचायतींचे 3 महिन्यांच्या आतील आर्थिक व्यवहारांची माहिती पंचायत समितीला देणे गरजेचे आहे. मात्र, ग्रामसेवकांकडून ती दिली जात नाही. प्रोसेडिंगही पूर्ण केले जात नाहीत. 80 टक्के ग्रामेवकांचे दप्तर पूर्ण नाही. त्यांची ग्रामपंचायतीमध्ये नावापुरतीच उपस्थिती असते. त्यांना कोणाचीही राहिलेली नाही. याप्रकरणी नवीन गटविकास अधिकाऱ्यांनी नवा राजा…नवा कासदा या उक्तीप्रमाणे आवश्यक बदल करून ग्रामपंचायत प्रशासनात गतिमान करावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्य सुहास बोराडे यांनी केली.

  डॉ. कागदी यांची कागदावरच उपस्थिती

  काले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कागदी यांची फक्त कागदावरच उपस्थिती आहे. त्यामुळे रुग्णांची होत आहे. अनेक रूग्णांना म:स्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत त्यांच्याकडे विचारणा केल्यास त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे डॉ. कागदी यांच्यासाठी काले पीएसी म्हणजे आओ जाओ, घर तुम्हारा अशीच अवस्था झाल्याचा आरोप पंचायत समिती सदस्या मनिषा पाटील यांनी केला.