सिध्दनाथ यात्रेपूर्वी सर्व प्रश्न मार्गी लावणार : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

नियोजित कामे अपूर्ण राहिल्यास खैर नाही

  म्हसवड : सिध्दनाथ यात्रेपूर्वी यासंदर्भात येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्याचे आदेश संबधित सर्व विभागांना देण्यात आले आहेत, त्याची अंमलबजावणी सुरु असल्याचे संबधित विभागाच्या प्रमुखांनी स्पष्ट केले असले तरी १० डिसेंबर रोजी आपण पुन्हा याठिकाणी येऊन प्रत्यक्ष कामांची पाहणी करणार आहोत यावेळी जर एखादे काम अपूर्ण राहिल्यास मात्र त्या विभागाची खैर नाही, अशी तंबी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी देत सिध्दनाथ यात्रेपूर्वी म्हसवड शहरातील सर्व प्रश्न मार्गी लागतील, असे आश्वासीत केले.

  लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री. सिध्दनाथ व माता जोगेश्वरी देवीचा रथोत्सव येत्या १३ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे, यानिमीत्त शहरात भरणाऱ्या यात्रेच्या नियोजनाच्या बैठकीत जिल्हाधिकारी डुडी बोलत होते, यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख, आ. जयकुुमार गोरे, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, डि वाय एस पी. अश्विनी शेंडगे, तहसिलदार विकास अहिरे, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, तालुका वैद्यकिय लक्ष्मण कोडलकर, पोलिस स्टेशनचे राजकुमार भुजबळ, रथाचे मानकरी बाळासाहेब राजेमाने, जयसिंह राजेमाने, तेजसिंह राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, सयाजीराजे राजेमाने, गणपतराव राजेमाने, माजी नगराध्यक्ष विलासराव माने, सुरेश म्हेत्रे, विजय सिन्हा, नितीन दोशी, विजय धट, माजी नगरसेवक युवराज सुर्यवंशी, धनाजी माने, शहाजी लोखंडे, कैलास भोरे, विकास गोंजारी आदी प्रमुख उपस्थित होते,

  यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डुडी म्हणाले की, सदरची आढावा बैठक म्हणजे असे कोणीही अधिकाऱ्यांनी समजू नये की वर्षातून एकदा होते. प्रश्न विचारतात अन् सोडून देतात. मी यावेळी प्रत्येक विभागाची जातीने चौकशी करुन त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्यांची तपासणी करणार आहे. यामध्ये जर कोणी कसूर केल्याचे निदर्शनास आल्यास मात्र त्या अधिकाऱ्यांची खैर नाही. यात्रेची मुख्य जबाबदारी ही म्हसवड पालिकेची असल्याने पालिकेने याबाबत काय उपाययोजना केल्या आहेत याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेत यावेळी पालिकेला आणखी ४०० तात्पुरते कर्मचारी नेमण्याचे आदेश दिले, तर आरोग्य विभागाने प्रत्येक १ कि.मी. वर एक रुग्णवाहिका तैनात ठेवण्याची व पालिका इमारतीशेजारी एक तात्पुरते रुग्णालय उभारावे त्यामध्ये तज्ञ डॉक्टरांची टिम तैनात ठेवावी, पुरेसा औषधसाठी त्याठिकाणी ठेवावा यासह म्हसवड आरोग्य केंद्र‌ व खाजगी रुग्णालयात बेड आरक्षित करुन ठेवावेत, असे आदेश देत याबाबत जी मदत लागेल ती आपण उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासीत केले.

  यावेळी माण – खटावचे आ. जयकुुमार गोरे यांनी बोलताना एस.टी. विभागावर प्रचंड नाराजी व्यक्त केली, एस.टी. विभागाने मुबलक एस.टी. देण्यापेक्षा थोड्याच पण चांगल्या एस.टी प्रवाशांना उपलब्ध करुन द्याव्यात, प्रत्येक वर्षी ऐन रथादिवशी ठिकठिकाणी बंद पडलेल्या एस.टी. बसेस आपण पहात आलो असून यामुळेच यात्रेदिवशी वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचे स्पष्ट केले.

  तर सातारा – पंढरपूर या महार्गावर माण परिसरात कोठेही सुचना फलक नाहीत, दिशादर्शक फलक नाहीत, रिप्लेक्टर नाहीत महामार्गाचे काम व्यवस्थित झाले नाही. यामुळेच तालुक्यातील अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याचे निदर्शनास आणून देत आजच संबधित महामार्गाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जर पोलिस प्रशासनाने हा गुन्हा दाखल केला नाही तर आपण हा प्रश्न येत्या अधिवेशनात विधानसभेत मांडून पोलीसांवरच गुन्हा दाखल करण्याचा प्रश्न मांडणार असल्याचे खडसावले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत संबधित विभागावर कारवाई करण्याचे संकेत दिले. तर यात्राकाळात कोणत्याही भाविकांना त्रास होणार नाही, याची ग्वाही दिली. यावेळी बीडीओ दहिवडी, साबां उप अभियंता धीरज विजापुरे, सहाय्यक अभियंता प्रकाश गायकवाड, शाम ठोंबरे, ग्रामीण पाणीपुरवठा सचिन खताळ, म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लोखंडे, वाहक नियंत्रक कोळी एम. एस. सी. बी.चे उपअभियंता आर. बी .डावरे , आर एम लादे, वसंत भोसले, म्हसवड शहर वीज वितरण कंपनी उपअभियंता, म्हसवड नगरपालिका मुख्य लिपिक म्हसवड शहर नगरपालिका अभियंता चैतन्य देशमाने म्हसवड- महसूल तलाठी यु‌. डी‌. आकडमल म्हसवड देवस्थान ट्रस्ट विश्वस्त गणेश गुरव,हरिभाऊ गुरव, वैभव गुरव, बुरांडे वकील, पत्रकार व ग्रामस्थ उपस्थित होते.

  श्रींचा रथ हा माणगंगा नदीपात्रातून
  श्री.सिध्दनाथ व माता जोगेश्वरी देवी चा रथ हा येथील माणगंगा नदीपात्रात नेण्याची फार जुनी परंपरा आहे, मात्र गतवर्षी या नदीपात्रात पाणी असल्याने श्रीं. चा रथमार्ग बदलण्यात आला होता, प्रशासनाचा तो निर्णय मानकरी व भाविकांना गतवर्षी रुचला नव्हता, यंदा माणगंगा नदीपात्र कोरडे ठणठणीत असल्याने श्रीं.चा रथ हा नदीपात्रातून नेण्यात यावा, ही लोकभावना विचारात घेऊन त्याप्रमाणे पाऊस व पाणी याचा विचार करुन निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याने यंदा श्रींचा रथ हा माणगंगा नदीपात्रातुनच जाणार असल्याची चर्चा भाविकांमध्ये सुरु झाली आहे.

  जिल्हाधिकाऱ्यांचे होमवर्क –
  दरवर्षी सिध्दनाथ यात्रेच्या नियोजन बैठकीत गोंधळ होत असल्याने बैठकीचा मतितार्थ बाजूला राहून बैठकीतच नागरीकांची प्रशासनासमोर हमरीतुमरी सुरु असते याची परिपूर्ण माहिती घेऊनच जिल्हाधिकारी डुडी यांनी बैठकीला येण्यापूर्वीच यात्रा नियोजनाची पूर्ण माहिती येण्यापूर्वी संपूर्ण रथमार्गाची स्वत: पाहणी केली अन् मगच बैठकीला सुरुवात केली. त्यामुळे नियोजन बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.