तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद देणार : प्रभाकर देशमुख

    वडूज : कोणतीही संघटना ही सर्वसामान्य कार्यर्त्यांमुळेच उभी राहत असते. भविष्यात अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी पक्षाची ताकद उभा केली जाईल, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) यांनी केले.

    येरळवाडी (ता.खटाव ) येथे युवा संकल्प सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज समाजभूषण पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते दादासाहेब गोडसे, माजी सभापती संदीप मांडवे, बाळासाहेब सावंत, प्रशांत जाधव, बाळासाहेब पोळ, सरपंच योगेश जाधव, प्रताप काटकर, सदाशिव बागल, डॉ. संतोष मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    देशमुख म्हणाले, सरपंच योगेश जाधव व त्यांचे सहकारी प्रतिकुल परिस्थितीचा सामना करून समाजाची सेवा करत असल्याने त्यांचा मला अभिमान आहे. तरूणांना समाजाची नाडी सापडली की त्यांचा सेवाभाव वाढीला लागतो. संस्थेच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा पुरस्कार वडूज येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक, जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब गोडसे, भाग्यश्री बागल, निर्भया पथकाचे नितीन सजगणे, चंदनशिवे यांना देण्यात आल्याने मनस्वी आनंद होत आहे. कोणाचा सन्मान करावा हे ज्याला कळते त्याला समाजातील चांगल्या वाईट गोष्टी कळतात. ग्रामस्थांनी आपली मुलं चांगल्या पध्दतीने शिकावीत यासाठी प्रयत्न केले तर पुढची पिढी उज्वल होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

    संदीप मांडवे यांनी युवा संकल्प सोशल फाउंडेशनचे कौतुक करून सर्वोतपरी मदत करण्याचा शब्द दिला. प्रशांत जाधव यांनी सामाजिक व्यासपीठ असताना ही तूफान राजकीय फटकेबाजी करून जिल्हा परिषद निवडणुक लढवणार असल्याचे सांगत प्रभाकर देशमुख व संदीप मांडवे यांना उद्देशून आमचं ठरलयं आता तुम्ही आमचा निळू फुले करू नका, असे सांगितले.

    कार्यक्रमास प्रवीण बागल, रिहाल मुल्ला, श्रीनाथ बागल, अनिल चव्हाण यांच्यासह युवा सोशल फाऊंडेशनचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.