सुरूरच्या स्मशानभूमीत अल्पवयीन मुलीला पूजण्याचा अघोरी प्रकार

साताऱ्यातील सुरूर (ता. वाई) येथील अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत (Surur Cemetery) पुजण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार पुण्यातील मांत्रिक व मुलीच्या नातेवाईकांकडून घडला आहे.

    सातारा : साताऱ्यातील सुरूर (ता. वाई) येथील अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत (Surur Cemetery) पुजण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार पुण्यातील मांत्रिक व मुलीच्या नातेवाईकांकडून घडला आहे. दरम्यान, हा प्रकार स्थानिक युवकांच्या निदर्शनास येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी आणि तिचे नातेवाईक बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी भुईंज (ता. वाई) पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून, संशयितांना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक (वाई) डॉ. शीतल जानवे खराडे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

    वाई तालुक्यातील सुरूर गावाच्या स्मशानभूमीच्या कट्ट्यावर मुलीच्या मांडीवर कोंबडा देऊन मांत्रिकाने पूजन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्यावेळी तिच्यासमोर विविध साहित्य मांडल्याचे दिसत होते. यावेळी तिथे गेलेल्या स्थानिक तरुणांना संबंधित मुलीला त्रास होत असल्याने हे करत आहे, फक्त कोंबडा मारुन नेणार आहोत असं एका महिलेने सांगितलं. हा प्रकार युवकांच्या निदर्शनास येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी आणि तिचे नातेवाईक बेपत्ता झाले आहेत.

    अल्पवयीन मुलीच्या स्मशानभूमीत पुजनामुळे चर्चेला उधाण आलं आहे. वाई तालुक्यातील सुरूर गावाच्या स्मशानभूमीतील घटनेवर अंधश्रद्धा निमुर्लनचे कार्यकर्ते काय करणार याची देखील चर्चा सुरु आहे. याप्रकरणी भुईंज (ता. वाई) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, संशयितांना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक (वाई) डॉ. शीतल जानवे खराडे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक आशिष कांबळे करत आहेत.

    मांढरदेव (ता. वाई) येथील काळूबाईच्या दर्शनासाठी येणारे भाविक दावजी पाटील मंदिरात दर्शनासाठी भेट देत असतात. सुरूर (ता. वाई) या गावातील धावजी पाटील या मंदिरात तांत्रिक मांत्रिक काही अघोरी प्रकार करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर पुजाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर या मंदिर परिसरातील बाहेरून येणाऱ्या पुजाऱ्यांचे तंत्रमंत्र प्रकार पोलीस हस्तक्षेपाने बंद झाले होते. सुरूर ता. वाई येथील स्मशानभूमी या मंदिरापासून काही अंतरावरच आहे तिथेच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.