शिक्षण विभागाची झेडपी सीईओ कडून झाडाझडती

जिल्हा परिषदेच्या सातारा तालुक्यातील एका प्राथमिक शाळेतील शिक्षिकेने गटशिक्षणाधिकारी यांच्यावर केलेल्या गंभीर तक्रारीची नोंद घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

    सातारा: गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात सातारच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचे प्रकरण गाजत आहे. मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन ताब्यात घेतले, तरी प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना माहिती देण्यात आली नव्हती. ही माहिती समजल्यावर त्यांनी शिक्षण विभागाची बैठक बोलावत सर्वांचा समाचार घेतला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल आपणास तत्काळ देण्याचे आदेश गौडा यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांना दिले आहेत.

    जिल्हा परिषदेच्या सातारा तालुक्यातील एका प्राथमिक शाळेतील शिक्षिकेने गटशिक्षणाधिकारी यांच्यावर केलेल्या गंभीर तक्रारीची नोंद घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे प्राथमिक शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. इतके महाभारत घडुनही प्राथमिक शिक्षण विभागाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विनय गौडा यांना माहिती देणे गरजेचे होते. पण त्यांना माहिती देण्यातच आली नाही.

    ‘त्या’तक्रारीवर काय कार्यवाही?
    ही माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांना मिळाल्यानंतर त्यांनी शिक्षण विभागाची बैठक घेत सर्वांची झाडाझडती घेतली. या बैठकीस प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, सर्व उपशिक्षणाधिकारी, सातारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, विस्तार अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, संबंधित शिक्षिकेने गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्या विरोधात विशाखा समितीकडे लेखी तक्रार केली आहे. त्या तक्रारीच्या कार्यवाहीचे काय झाले, अशीही विचारणा मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी संबंधित विभागाला केली. त्यावर सकारात्मक उत्तर न मिळाल्याने त्याबाबत चौकशी करून त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश गौडा यांनी दिले आहेत.