शिरोळचा तिढा सुटणार ; सतेज पाटील काढणार मार्ग

निवडणुकीत मंत्री यड्रावकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला होता. तर सर्वपक्षीयांच्या माध्यमातून गणपतराव पाटील यांनी आव्हान निर्माण केले आहे. हा तिढा सोडविण्यासाठी जिल्हा बँकेचे नेतृत्व करणारे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी विशेष लक्ष दिले आहे. गणपतराव पाटील यांच्यासाठी राजू शेट्टी यांच्यासह सर्वपक्षीयांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यामुळे शिरोळ सेवा सोसायटी मतदारसंघात कमी-जास्त झाल्यास इतर नऊ राखीव जागा धोक्यात जाऊ नयेत असे जिल्हा नेतृत्वाला वाटते.

    जयसिंगपूर:  कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. तालुक्यातील संख्याबळानुसार समझोता घडणार आहे . ज्यांचे संख्याबळ जास्त त्यांना बँकेवर संधी देण्यात येणार आहे. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी नेतेमंडळी आग्रही आहेत. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांच्या एकत्रित चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिरोळ तालुक्यात आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्यात पहिल्यांदाच कमालीचा संघर्ष सुरु आहे. त्यामुळे यामध्ये मार्ग काढावा असे जिल्हा नेतृत्वाला वाटते.

    या निवडणुकीत मंत्री यड्रावकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला होता. तर सर्वपक्षीयांच्या माध्यमातून गणपतराव पाटील यांनी आव्हान निर्माण केले आहे. हा तिढा सोडविण्यासाठी जिल्हा बँकेचे नेतृत्व करणारे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी विशेष लक्ष दिले आहे. गणपतराव पाटील यांच्यासाठी राजू शेट्टी यांच्यासह सर्वपक्षीयांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यामुळे शिरोळ सेवा सोसायटी मतदारसंघात कमी-जास्त झाल्यास इतर नऊ राखीव जागा धोक्यात जाऊ नयेत असे जिल्हा नेतृत्वाला वाटते. यावर पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज पत्रकार बैठकीत उत्तर दिले आहे. दोन्ही उमेदवारांना बँकेवर संचालकपदाची संधी देण्यात येणार असून यामध्ये एका उमेदवाराला स्वीकृत तर दुसऱ्याला बिनविरोध करण्याची सकारात्मक चर्चा झाल्याचे ना. सतेज पाटील सांगितले.

    परंतु सर्व सेवा सोसायटी मतदार संघात कोण व स्वीकृत संचालक पदाची संधी कोणाला हे अजून स्पष्ट झाले नाही. स्वीकृत संचालक पदाची वाट कोण पाहणार हे अजून अनुत्तरित असल्यामुळे सर्व नेते मंडळींच्या बैठकीत यावर तोडगा निघणार असल्याचे दिसून येत आहे .तदनंतर केडीसीसी बँकेच्या निवडणुकीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.