सोलापूरच्या बांधकाम व्यावसायिकाची पुण्यात पिस्तूल अन् रोकड चोरली

सोलापूरमधील एका बांधकाम व्यावसायिकाची पुण्यात आल्यानंतर कारमधून परवानाधारक पिस्तूल आणि दोन लाखांची रोकड चोरून नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

    पुणे : सोलापूरमधील एका बांधकाम व्यावसायिकाची पुण्यात आल्यानंतर कारमधून परवानाधारक पिस्तूल आणि दोन लाखांची रोकड चोरून नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
    याप्रकरणी ५० वर्षीय व्यक्तीने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी रात्री घडला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील आहेत. ते बांधकाम व्यावसायिक असून, त्यांच्याकडे परवानाधारक गन अँड सेल कंपनीची ३२ बोअरची पिस्तूल आहे. दरम्यान ते सोमवारी (दि.२०) मुलाला लोणावळ्यात शाळेत सोडण्यासाठी निघाले होते. कार घेऊन ते जात असताना पुण्यातील लष्कर परिसरात खरेदीसाठी थांबले होते. त्यांनी त्यांची कार एम.जी. रोडवरील मोनाफूड हॉटेलसमोर पार्क केली होती.

    तसेच चालकाला थांबण्यास सांगितले होते. त्यांनी दोन लाखांची रोकड व पिस्तूल बॅगेत ठेवले व ती बॅग कारमध्ये ठेवली होती. यादरम्यान, ते खरेदीसाठी गेले असता अनोळखी एकजण कारजवळ आला व त्याने चालकाला खाली पैसे पडल्याचे सांगितले. चालक उतरताच त्याने बॅग चोरून नेली. परंतु, त्याच्याही हा प्रकार लक्षात आला नाही. तक्रारदार खरेदी करून परत आले व ते जाण्यास निघाले.

    बंडगार्डन परिसरात आल्यानंतर त्यांना बॅग नसल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. तर पोलीसांना घटनेची माहिती दिली. त्याने पोलीसांना प्रवासात चोरी झाल्याचे सांगितले. पण, पोलीसांनी संपूर्ण चौकशी केली असता चालकाने मी कारमध्ये बसलो असताना एकजण आला व त्याने पैसै पडल्याचे सांगितले म्हणून मी उतरलो होतो, असे सांगितले. त्यावेळी पोलिसांना चोरी ही त्याचवेळी झाली असल्याचे लक्षात आले. त्यानुसार पोलीसांकडून तपास सुरू आहे. अधिक तपास उपनिरीक्षक डोंगळे हे करत आहेत.