मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे येथे शटर उचकटून चोरट्यांकडून ७१ हजार रुपये लंपास

    मोहोळ : सय्यद वरवडे ता. मोहोळ येथील बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक सेवा केंद्राचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी ७१ हजार रुपये लंपास केल्याची घटना २५ जून रोजी मध्यरात्री घडली.

    याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शब्बीर सरदार मुलाणी यांचे सय्यद वरवडे येथे बँक ऑफ इंडियाचे ग्राहक सेवा केंद्र असून त्या माध्यमातून गावातील व परिसरातील नागरिकांना ते पैशाची देवाण घेवाण करतात. दिनांक २५ जून रोजी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान दिवसभराचे पैसे काढणे व भरण्याची कामे संपवून ७१ हजार ८४० रुपये अशी रक्कम काउंटर मध्येच मोजून ठेवून मुलाणी घरी गेले होते. त्याच दरम्यान मध्यरात्री ग्राहक सेवा केंद्राचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी काउंटरच्या ड्रॉवरमधील पैसे लंपास केले.

    २६ जून रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुलाणी हे दुकानाचे शटर उघडून साफसफाई करण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे शटर अर्धवट स्वरूपात उघडे दिसले व आतील स्टेशनरी सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. चोरट्यांनी कटरच्या साह्याने शटर उचकटून आतमध्ये प्रवेश करत चोरी केल्याचे निदर्शनास आले असून, मुलाणी यांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार शेख करीत आहेत.