crime scene

    सोलापूर : ‘तुझ्या बापाची भिंत आहे का?’ असे म्हणत किराणा दुकानदाराच्या डोक्यात वीट घालून जखमी केल्याची घटना गुरुवारी (दि.२३) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वाणी गल्ली बाळे सोलापूर येथे घडली. याप्रकरणी सिद्धेश्वर गुरुलिंग बटाणे (वय-६२,रा.वाणी गल्ली,बाळे सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून दत्तात्रय ढेकणे, शिवा ढेखने, राधा ढेखने, अश्विनी ढेकणे (सर्व.रा.वाणी गल्ली बाळे,सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सिद्धेश्वर बटाणे यांना संशयित आरोपी दत्तात्रय ढेकणे यांनी तुझ्या बापाची भिंत आहेत का असे म्हणत फिर्यादीस अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत तुला जगू देणार नाही, असे म्हणून दमदाटी केली. त्यानंतर रस्त्यावर पडलेली वीट हातात उचलून शिवीगाळ करत फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक चव्हाण हे करीत आहेत.