मोहोळ तालुक्यातील घाटणेत दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू

    मोहोळ : मोहोळ तालुक्यातील घाटणे गावच्या हद्दीत दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि. २४) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली.
    याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ ते मलिकपेठ रस्त्यावर घाटणे फाट्याजवळ दुचाकीवरून (एम. एच. ४५ ए सी १५०५) मलिकपेठ येथील तायाप्पा निवृत्ती साठे (वय ३२) व विशाल पंडित गवळी (वय १६) असे दोघे मोहोळकडून मलिकपेठकडे जात होते. त्यावेळेस समोरून दुचाकीवरून (एम एच १३ बी डी ४३४८) भोयरे ता मोहोळ येथील बाबासाहेब सत्यवान चव्हाण हा मोहोळकडे येत होते. दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक होऊन त्यामध्ये तायप्पा साठे यास गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले तर दुसऱ्या दुचाकीवरील बाबासाहेब चव्हाण यांनाही गंभीर मार लागल्याने त्यांना मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
    तसेच तायाप्पा साठे यांच्या दुचाकीवर पाठीमागे बसलेला विशाल गवळी याला गंभीर मार लागल्याने स्थानिक नागरिकांनी त्याला मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात आणले होते. त्याच्यावर प्रथमोपचार करून त्याला पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलवले आहे.
    मलिकपेठ व भोयरे येथील दोन तरुणाच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. मोहोळ पोलीस ठाण्यात या घटनेची खबर मलिकपेठचे उपसरपंच गणेश जगताप यांनी दिली असून अधिक तपास अपघात पथकाचे पोलिस हेड कॉन्स्टेबल अविनाश शिंदे करत आहेत.