महागाईविरोधात अकलूजमध्ये आंदोलन

    अकलूज : केवळ अदानी-अंबानींच्या हितासाठी देशातील तमाम जनतेला वेठीस धरणाऱ्या देशघातकी सरकारचा निषेध करण्यासाठी व गेली वर्षभरापासून दिल्लीत उन्ह-पावसाची व सरकारच्या छळाची पर्वा न करता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी हे धरणे आंदोलन असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी दिली.

    काँग्रेसप्रणित भारत बंदच्या पार्श्वभूमीवर अकलूज येथील प्रांताधिकारी यांच्या कार्यालयासमोर तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन करून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

    यावेळी बोलताना माजी आमदार व काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष रामहरी रुपनवर म्हणाले की, या सरकारने जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची लूट होईल व त्याचा फायदा अदानी अंबानी या दोनच व्यापाऱ्यांना होईल. यासाठी हे तीन कायदे केले असून, त्यामुळे या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांच्या  लाखो एकर जमिनी घेता येणार आहेत. हे सरकार पूर्ण देशविरोधी असून त्यांनी देशाच्या मालकीच्या अनेक संपत्ती अदानी-अंबानीलाच विकल्या असून अजूनही काही राष्ट्रीय संपत्ती विकण्याच्या हालचाली सुरू आहेत. या सरकारची धोरणे पूर्ण शेतकरी विरोधी असून, गेल्या आठवड्यात सोयाबीनला ११ हजार रुपयांचा दर मिळताच त्यांनी लाखो टन सोयाबीन आयात करून शेतकऱ्यांना मिळणारे दर पाडले.

    आंदोलनासाठी शिरीष फडे, सतीश पालकर, राजेंद्र रुपनवर, ऍड. नागनाथ काकडे, बाळासो मगर, गिरीश शेटे, अण्णासाहेब इनामदार, माणिक मिसाळ, सुधीर रास्ते, महादेव बंडगर, नवनाथ साठे, मुबारक कोरबू, नाना काळे, अण्णासाहेब शिंदे, ज्योती कुंभार, मयूर माने आदी उपस्थित होते. हे आंदोलन सुमारे दोन तास सुरू होते.