जिल्ह्यात सर्व शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात – खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी

खा. महास्वामी यांनी , ज्या विभागांनी शासनाने दिलेले योजनेचे उद्दीष्ट खूप कमी प्रमाणात पूर्ण केले आहे. त्या संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी उद्दीष्ट कमी प्रमाणात का पूर्ण झाले आहे त्याबाबत विचारणा करून संबंधित अधिकाऱ्यांना उद्दीष्ट पूर्ण करतांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्याबाबत त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

  सोलापूर : जिल्ह्यात केंद्र शासनाच्या विविध विभागाच्या वतीने अनेक योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जात असतो. हा निधी व त्याचा लाभ संबंधित पात्र लाभार्थी यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सर्व संबंधित शासकीय विभाग प्रमुखांची आहे. केंद्र शासनाने दिलेल्या उद्दिष्ट प्रमाणे शंभर टक्के निधी खर्च करावा, असे निर्देश सोलापूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी दिले.

  जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती आढावा बैठक आज शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथील बैठक सभागृहात समितीचे अध्यक्ष तथा सोलापूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

  यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक संतोष धोत्रे, उपजिल्हाधिकारी (महसूल) विठ्ठल उदमले, जिल्हाशल्यचिकित्सक प्रदिप ढेले, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे – पाटील, जिल्हा कृषि अधिक्षक बाळासाहेब शिंदे तसेच विविध शासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते.

  खा. महास्वामी यांनी , ज्या विभागांनी शासनाने दिलेले योजनेचे उद्दीष्ट खूप कमी प्रमाणात पूर्ण केले आहे. त्या संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी उद्दीष्ट कमी प्रमाणात का पूर्ण झाले आहे त्याबाबत विचारणा करून संबंधित अधिकाऱ्यांना उद्दीष्ट पूर्ण करतांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्याबाबत त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. स्मार्ट सिटीच्या अपूर्ण कामांबाबत लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकारी यांना दिल्या. सर्व शासकीय विभागांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय योजना प्रभाविपणे राबवाव्यात व सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे, असेही ते यावेळी म्हणाले.

  यावेळी खासदार महास्वामी यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दिन दयाळ अंत्योदय योजना/ राष्ट्रीय ग्रामीण जिवन्नोती अभियान, प्रधान मंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय सामाजिक साह्य कार्यक्रम, प्रधान मंत्री आवास योजना शहरी , प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण, स्वच्छ भारत मिशन शहर, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण , राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना, भूमी अभिलेखाचे संगणीकरण, दिन दयाळ उपाध्याय ग्रामीण जोती योजना, राष्ट्रीय वारसा शहर विकास आणि अंत्योदय योजना, काया कल्प और शहरी परिवर्तन अटल मिशन (अमृत), स्मार्ट सिटी योजना, प्रधान मंत्री कृषि विमा योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, एकात्मिक बाल विकास योजना, मधान्ह भोजन शहरी व ग्रामीण, प्रधानमंत्री कौशल्य विकास प्रकल्प, डिजिटल इंडिया, सांसद आदर्श ग्राम योजना इत्यादी योजनांचा सविस्तर आढावा घेऊन सर्व संबंधित विभाग प्रमुखांना योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या.

  प्रारंभी जिल्हाधिकारी तथा समितीचे सचिव मिलिंद शंभरकर यांनी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे सदस्य असलेल्या विविध विभाग प्रमुख यांनी योजनांच्या अंमलबजावणीबाबत केलेल्या कामकाजाची माहिती सादर केली.