तालुक्यातील ‘विठ्ठल’सह चार सहकारी कारखान्यांवर प्रशासक नेमा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

एकीकडे आपल्याच तालुक्यातील कारखानदारीत नवखे असलेले अभिजीत पाटील जुने कारखाने भाडेतत्त्वावर घेऊन चांगले चालवत आहेत.

    पंढरपूर : सध्या शेतकरी कोरोनामुळे अडचणीत असताना चेअरमन मंडळी रोज पुणे आणि मुंबईच्या वार्‍या करत आहेत आणि दुसरा सीझन सुरू होण्याची वेळ आली तरी शेतकऱ्यांना पहिले बिल मिळत नाही, अशा परिस्थितीत आम्ही आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शरद पवार यांना भेटून या तालुक्यातला सहकार वाचवायचा असेल, तर या कारखान्याचे निष्क्रिय संचालक मंडळ बरखास्त करा आणि या कारखान्यांवर तुकाराम मुंढेसारखा सक्षम प्रशासक नेमावा, अशी मागणी करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे.

    ते पुढे म्हणाले की, श्री विठ्ठलसह अनेक कारखान्यावर राज्य सहकारी बॅंकेची जप्तीची टांगती तलवार कायम आहे. ज्या कारखान्याकडे थकीत ऊस आणि कामगारांचे पगार तोडणी वाहतूक बिलासंदर्भात थकीत रक्कम आहे. त्या संदर्भात गेल्या अकरा महिन्यांपासून निवेदन देत आंदोलने करत शेतकरी संघटनेने हा प्रश्न समोर आणण्यासाठी प्रयत्न केला. परंतु दुसरा सिजन तोंडावर आला तरी या चेअरमन आणि संचालक मंडळाला त्या गोष्टीचं गांभीर्य नाही. आता यांच्या विरोधात आंदोलन करायची आम्हाला देखील लाज वाटू लागली आहे. परंतु या संचालक मंडळाला काही घाम येत नाही.

    सभासद कामगार व संस्था गरिब झाली.तर मग चेअरमन व संचालक मंडळाकडे गाड्या, बंगले कोट्यवधीची स्व मालकीची मालमत्ता कुठून आली? अशी परिस्थिती झाल्यामुळे आज आम्ही ही पत्रकार परिषद घेतली आहे. खरं तर आज या चेअरमन मंडळीने शेतकरी सभासदां समोर येऊन कारखाने कधी सुरू होणार आहेत, कारखान्याचे बिल कधी मिळणार आहे. कामगारांचे पगार कधी मिळणार आहेत, तोडणी वाहतुकीचे पैसे कधी मिळणार आहेत. या गोष्टी जाहीर करणे गरजेचे आहे. परंतु अशावेळी सुद्धा हे सर्व चारी कारखान्याचे चेअरमन नॉट रिचेबल आहेत आणि कारखान्याचा कारभार रामभरोसे चालू आहे. त्यामुळे शेतकरी सभासद संभ्रमावस्थेत आहेत.

    ट्रॅक्टर तर अक्षरशः फायनान्सने ओढून नेण्याची वेळ आलेली आहे. कामगारांच्या घरातील बायका दुसऱ्याच्या शेतात खुरपायला जायची वेळ आलेली आहे. अशी परिस्थिती गंभीर परिस्थिती असताना शेतकरी कोरोनामुळे अडचणीत असताना चेअरमन मंडळी रोज पुणे आणि मुंबईच्या वार्‍या करत आहेत आणि दुसरा सीझन सुरू होण्याची वेळ आली तरी आमचे पहिले बिल मिळत नाही, अशा परिस्थितीत आम्ही आता मुख्यमंत्री व शरद पवार यांना भेटून या तालुक्यातील सहकार वाचवायचा असेल तर या कारखान्याचे निष्क्रिय संचालक मंडळ बरखास्त करा आणि या कारखान्यांवर तुकाराम मुंढेसारखा सक्षम प्रशासक नेमा आणि शासकीय यंत्रणेमार्फत हे कारखाने यशस्वीपणे चालवून सांगली आणि कोल्हापूर प्रमाणे दराची स्पर्धा करावी, अशी या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत, असे स्पष्ट केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

    सोलापूर जिल्हा ऊस उत्पादनात पहिल्या क्रमांकावर

    एकीकडे आपल्याच तालुक्यातील कारखानदारीत नवखे असलेले अभिजीत पाटील जुने कारखाने भाडेतत्त्वावर घेऊन चांगले चालवत आहेत. तर दुसरीकडे श्री विठ्ठल भीमा दामाजी सहकार शिरोमणी हे शेतकऱ्यांचे फुकटात नेतृत्व करण्यासाठी मिळालेले कारखाने चेअरमन व संचालक यांच्या भ्रष्ट कारभारामुळे शेवटच्या घटका मोजत आहेत. सोलापूर जिल्हा ऊस उत्पादनात पहिल्या क्रमांकावर असताना ऊस दराच्या बाबतीत शेवटचा क्रमांक का लागतो, सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर 3100 टन दर मिळतो, मग इथं का नाही, असा सवाल सचिन पाटील यांनी केला.