आष्टीला विकासातून बनविणार स्मार्ट गाव : सरपंच डॉ. अमित व्यवहारे

  मोहोळ : साेलापूर जिल्ह्यातील आष्टी (ता. माेहाेळ) येथील ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडल्यानंतर २३ फेब्रुवारी २०२१ पासून गावच्या सरपंचपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. सर्व सुविधा व गावच्या सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजना करुन जवळपास १० हजार लोकसंख्या असलेल्या आष्टी गावाला विकासकामांनी नटवून जिल्ह्यात ‘स्मार्ट आष्टी’ बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा मनोदय सरपंच डॉ. अमित व्यवहारे यांनी व्यक्त केला.

  काेराेना काळात दुहेरी जबाबदारी

  स्वच्छता, पक्के रस्ते, स्वच्छ बंदिस्त गटारी, स्वच्छ पिण्यास पाणी अशी स्वप्ने घेऊन मी सरपंच पदावर विराजमान झालो. गावाच्या विकास कामाला सुरुवात करणार तेवढ्यात कोरोनाची दुसरी लाट आली आणि गाव कोरोनाच्या विळख्यात अडकले. बघता बघता कोरोनाचे शंभर रुग्ण झाले आणि गाव रेड झोनमध्ये आले. आधीच्या पहिल्या लाटेमध्ये प्रत्येक गावांमध्ये कोरोना समिती केली होती. त्या समितीचे अध्यक्ष तलाठी होते, परंतु दुसऱ्या लाटेमध्ये अध्यक्ष सरपंच असावेत असे घोषित केले. आणि माझ्यावर दुहेरी जबाबदारी येऊन ठेपली. मी स्वतः डॉक्टर असल्याने रुग्ण व त्यांची घ्यावयाची काळजी आणि त्यावरील उपचार माहिती नागरिकांना दिली, असे सरपंच डॉ. व्यवहारे यांनी सांगितले.

  गावची काेराेनामुक्तीच्या दिशेने वाटचाल

  जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माझं गाव, माझी जबाबदारी’, ‘गाव तिथे कोरोना सेंटर’ या संकल्पनेतून ‘कोरोना मुक्त गाव’ असा उपक्रम हाती घेतला. आज गावातील कोविड सेंटरमध्ये केवळ चार रुग्ण उपचार घेत असून तेही ठणठणीत बरे झाले आहेत. कोविड सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना स्वतः मोफत सेवा देत आहे. शिक्षक, गटविकास अधिकारी विकास यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांनी यामध्ये घरोघरी जाऊन सर्वे केला, असे सरपंच डॉ. व्यवहारे यांनी सांगितले.

  सोशल मीडियावरून जनजागृती

  आष्टी गावचे उपसरपंच निखिल गुंड, ग्रामसेवक गडेकर भाऊसाहेब, तलाठी खंडागळे यांनी गावातील दुकाने केव्हा चालू करणे, केव्हा बंद करणे, याचे नियोजन केले. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवणे, प्रत्येक दुकानदारास चाचणी करून घेण्यास सांगणे, ग्राहकास व दुकानदारास मास्क घालण्यास सांगणे, गावांमध्ये वेळोवेळी रॅपिड टेस्ट आणि लसीकरण योजना राबवल्या. त्यासाठी गावातील अाराेग्य विभागाचे कर्मचारी आणि आशा वर्कर याचे मोठे योगदान लाभले, पोलीस पाटील खासेराव पाटील यांनी जनता कर्फ्यू, सोशल डिस्टन्िसंगबाबत नागरिकांना प्रोत्साहित केले. शिक्षक शंकर माने यांनी सोशल मीडियावरून जनजागृती केली, असे सरपंच डॉ. व्यवहारे यांनी नमूद केले.

  गावाला जोडणाऱ्या सर्व वाड्या वस्त्यावरील व गल्ली बोळापर्यंतचे सर्व रस्ते तसेच अंतर्गत गटारी करणे, स्मशानभूमी शेड, हातपंप दुरुस्ती, गावामध्ये वृक्षारोपण करणे, शालेय शिक्षण समितीच्या माध्यमातून वाचनालय, शिक्षणावर भर देऊन विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रमशील शिक्षण देणे, विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी व्यायामशाळा सुरू करणे यासारखे सार्वजनिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

  – डॉ. अमित व्यवहारे, सरपंच

  उपक्रमांत सामाजिक संस्थांचा सहभाग

  गावामध्ये वेळोवेळी सॅनिटायझर फवारणी करून घेतली. गावामध्ये जास्त लाेकांचा जमाव होत असल्याने प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडून गावांमध्ये पोलीस बंदोबस्तची मागणी केली. त्यांनी कमांडो पाठवून गाव कडक बंदोबस्तात ठेवले. जमावबंदीतून कोरोनावर आळा घालण्याचा प्रयत्न केला. परिणामी गावातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत गेली आणि गाव कोरोनामुक्त गाव होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागले. या पूर्ण काळात गावातील कोरोना समितीचे सर्व समन्वयक व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी मंडळी विशेषत: जनपरिवर्तन संस्था, सह्याद्री प्रतिष्ठान व सार्वजिनक मंडळे यांचा हातभार लागला, असे सरपंच डॉ. व्यवहारे यांनी सांिगतले.
  (शब्दांकन : दादासाहेब गायकवाड)