पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भारत भालके निवडणुकीच्या रिंगणात

भारत भालके यांचे काही महिन्यापूर्वीच कोरोनामुळे निधन झाले. यानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी कुणाला संधी मिळणार याकडे सर्व राज्याचे लक्ष्य लागून होते. भाजपने यापूर्वीच समाधान महादेव आवताडे यांना आपला अधिकृत उमेदवार जाहीर केले आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारची स्थापना झाल्यापासून ही विधानसभेसाठीची पहिली पोटनिवडणूक असल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे

  मुंबई: पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीने दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भारत भालके यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली. राष्ट्रवादीचे नेते आणि पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने यापूर्वीच आपला उमेदवार जाहीर केला होता. मात्र बर्‍याच प्रतिक्षेनंतर आज अखेर राष्ट्रवादीनेही आपला उमेदवार जाहीर केला आहे.

  भाजपची उमेदवारी समाधान महादेव आवताडेंना

  भारत भालके यांचे काही महिन्यापूर्वीच कोरोनामुळे निधन झाले. यानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी कुणाला संधी मिळणार याकडे सर्व राज्याचे लक्ष्य लागून होते. भाजपने यापूर्वीच समाधान महादेव आवताडे यांना आपला अधिकृत उमेदवार जाहीर केले आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारची स्थापना झाल्यापासून ही विधानसभेसाठीची पहिली पोटनिवडणूक असल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. अशातच भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी या पोटनिवडणुकीसाठी आपले उमेदवार घोषित केले आहेत. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून भगीरथ भारत भालके यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चुरशीची होणार असल्याचं दिसून येत आहे.

  जयंत पाटील यांनी केले ट्विट

  आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात येत आहेत. ते नक्की विजय होतील, असा आम्हाला विश्वास आहे. भगीरथ भालके यांना शुभेच्छा ! , असे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे.

  उद्या उमेदवारी अर्ज दाखल होणार

  राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढण्यासाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र, भगीरथ भालके यांनाच उमेदवारी देण्यात यावी, असा आग्रह कार्यकर्त्यांतून केला जात होता. त्यामुळं पक्षासमोरचा पेच वाढला होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे तासगाव पॅटर्नप्रमाणे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही होते. तर आधी राष्ट्रवादी निवडणुकीत कोणता उमेदवार उतरवणार हे पाहून त्यानंतरच आपण उमेदवार द्यायचा, अशी रणनीती भाजपने आखली होती. मात्र, बराच काळ वाट पाहिल्यानंतरही राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केला नसल्यानं भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली. तर अखेरीस राष्ट्रवादीनं भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भगीरथ हे दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. ते उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे.