जनावरांना लाळ खुरकतच्या लस तातडीने उपलब्ध करून द्यावी : धैर्यशील मोहीते-पाटील

    अकलुज : माळशिरस तालुक्याच्या शेजारील पुणे जिल्ह्यातील इंदापूर परिसरात जनावरांना होणारा लाळ्या खुरकतीच्या साथीचा रोग आलेला आहे. याची लागण माळशिरस तालुक्यातील जनावरांमध्ये पसरू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तातडीने लस उपलब्ध करून देण्याची मागणी भाजप नेते व शिवामृत दुध उत्पादक सहकारी संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडे केली.

    सध्या माळशिरस तालुक्यामध्ये जवळपास सव्वादोन ते अडीच लाख जनावरे आहेत. सर्वसाधारणपणे लाळ्या खुरकुतीचा रोग खुर विभागलेल्या जनावरांना होतो हा रोग प्रामुख्याने सांसर्गिक पाणी व खाद्य खाल्ल्याने होतो. याचा गंभीर परिणाम जनावरांवर होतो जनावरांचे खाणे पिणे बंद होते. जनावरास ताप येतो तसेच जनावरांच्या जिभेवर टाळूवर व तोंडाच्या आतील भागात फोड येतात. जनावरांच्या तोंडातून चिकट तारेसारखी लाळ गळते. पुढील पायांमध्ये खुरातील बेचकीमध्ये फोड येतात व जनावरांना मागील पायांत फोड तयार झाल्यास अपंगत्व येते. यामूळे दुधाळ जनावरांत दूध उत्पादनात घट येते. काही वेळेस उत्पादन क्षमता कायमची नष्ट होण्याची शक्यता असते.

    शेतीचा जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यावसाय शेतकरी वर्ग करत असतो. या शेतकरी वर्गाचे नुकसान होऊ नये म्हणून तातडीने साथीच्या रोगावर उपाय म्हणून प्रतिबंधात्मक योजना करणे आवश्यक आहे. तरी माळशिरस तालुक्यामध्ये जनावरांना लाळ्या खुरकतीच्या साथीची लस तातडीने उपलब्ध करून द्यावी. तसेच तालुक्यामध्ये लाळयाचा प्रादुर्भाव होवू नये, म्हणून योग्य ते उपाय योजना करण्यासाठी तालुका स्तरावर नियोजन करावे, अशी मागणी धैर्यशील मोहीते पाटील यांनी सोलापूर जिल्हा परिषद पंशुसंवर्धन उपायुक्तांना केली