साथीचे रोग पसरु नयेत याची गांभीर्याने दक्षता घ्यावी; दिलीप स्वामी यांची सूचना

    सोलापूर : ‘स्वच्छ भारत मिशन’ (ग्रामीण) अंतर्गत वाढीव वैयक्तिक शौचालय बांधकाम व सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाचे उद्दिष्ट येत्या जून अखेर पूर्ण करावे आणि यंदाच्या मान्सूनमध्ये पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

    जिल्हा परिषदेमध्ये आज स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), जल जीवन मिशन व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध योजनांबाबत जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता यांच्या वेबेक्सच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये दिलीप स्वामी हे बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) गोरख शेलार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) चंचल पाटील, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल कटकधोंड आदी उपस्थित होते.

    स्वामी म्हणाले, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत वाढीव वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट ७०० इतके तर सार्वजनिक शौचालयाचे उद्दिष्ट ५० इतके असून, सदरचे उद्दिष्ट येत्या जूनअखेर पूर्ण करणे आवश्यक आहे. सध्याच्या मान्सूनमध्ये जिल्ह्यातील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी शुद्ध करण्याची दक्षता घेणे आवश्यक आहे. म्हणून येत्या जून अखेर गावातील पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची अणुजैविक तपासणी करुन घेण्यात यावी. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे साथीचे रोग पसरु नयेत, याची गांभीर्याने दक्षता घ्यावी.

    जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणीचे काम हे ८० टक्के पूर्ण झाले आहे. तर २० टक्के पाण्याचे स्त्रोत बंद अवस्थेत आहेत. यामध्ये रासायनिकदृष्ट्या बाधित असणाऱ्या स्त्रोतांबाबत संबंधित ग्रामपंचायतीस माहिती देऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व गट विकास अधिकारी व पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता यांना दिल्या आहेत. तसेच गावात पाणी पुरवठा करणाऱ्या जलकुंभाची स्वच्छता करुन घेण्यात यावी. यावेळी जल जीवन मिशन व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचाही आढावा घेऊन सदर योजनांचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली.