सीईओ दिलीप स्वामींच्या अडचणी वाढल्या; आमदार लाड दाखल करणार हक्कभंग प्रस्ताव

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swamy) यांच्या विरोधात आमदार अरूण लाड हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार असल्यामुळे प्रशासकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या संदर्भातील पत्र आमदार लाड यांनी दिले आहे. सीईओ स्वामी यांनी राजशिष्टाचाराचे उल्लंघन केल्याचा आरोप आमदार लाड यांनी केला आहे.

    याबाबत माहिती अशी की, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असून, देखील काँग्रेस राष्ट्रवादी आमदारांच्या सन्मानाला धक्का देण्याचे धाडस सोलापूर जिल्हा परिषदेनी केले होते. सीईओ दिलीप स्वामी यांच्या विरोधात कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळी होती. पुणे विभाग पदवीधर व शिक्षक संघटनेची निवडणूक होऊन वर्ष होत आले तरी जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर शिक्षक आमदार म्हणून दत्तात्रय सावंत यांचीच छबी असल्याचे दिसून आली होती.

    जिल्हा परिषदेत भाजप समविचारी आघाडीची सत्ता आहे. अध्यक्ष हे शिवसेना पक्षातील असल्यामुळे उलट सुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ तयार करून अनेक वर्षे होत आली आहेत. संकेतस्थळावर विविध विभागांच्या माहितीसह पदाधिकाऱ्यांची फोटोसहित माहिती अपलोड केलेली आहे. घडामोडीसह संकेतस्थळ अपडेट करण्याची जबाबदारी आयटी सेलवर आहे. पण आयटी सेलचे वेबसाइट अपडेट करण्याकडे लक्षच नसल्याचे दिसून आले आहे.

    पुणे पदवीधर आमदार म्हणून राष्ट्रवादीचे अरुण लाड यांची तर शिक्षक आमदार म्हणून काँग्रेसचे जयंत आसगावकर यांची निवड झाली. तरीपण जिल्हा परिषदेच्या त्यांच्या नावाचे वावडे असल्याचे दिसत आहे. वेबसाइटवर शिक्षक आमदार म्हणून दत्तात्रय सावंत यांचे छायाचित्र, पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक दिलेला होता. पुणे विभागात शिक्षकांची संख्या मोठी आहे. प्रश्नासाठी शिक्षकांना त्यांना संपर्क करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवरील माहितीसाठी अनेकजण भेट देतात. पण वेबसाइटवरील चुकीची माहिती पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही माहिती निदर्शनाला आणून देऊनही कर्मचाऱ्यांनी आपले काही देणंघेणं नाही, अशी भूमिका घेतली आहे.

    दरम्यान, २७ स्पटेंबर रोजी आमदार लाड यांनी जिल्हा परिषद संकेतस्थळाचे कामकाज पाहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर त्वरीत निलंबनाची कारवाई करा. अन्यथा सीईओ दिलीप स्वामी यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्याचा इशारा अरूण लाड यांनी पत्रात दिला आहे.