कोळे येथील स्मारक जिल्हयाची चैत्यभूमी ; जि.प. अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांचे प्रतिपादन

सांगोला तालुक्यातील कोळे गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिविहार व अभ्यासिका भूमीपूजन कार्यक्रम जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे, माजी आमदार दीपक साळुंखे, धम्म भिक्षु यांच्या उपस्थितीत कुदळ मारून भूमिपूजन कार्यक्रम पार पडला

    सांगोला : सांगोला तालुक्यातील कोळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिविहार जिल्ह्यातील चैत्यभूमी होईल असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी केले.

    सांगोला तालुक्यातील कोळे गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिविहार व अभ्यासिका भूमीपूजन कार्यक्रम जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे, माजी आमदार दीपक साळुंखे, धम्म भिक्षु यांच्या उपस्थितीत कुदळ मारून भूमिपूजन कार्यक्रम पार पडला, यावेळी व्यासपीठावर समाज कल्याण सभापती संगीता धांडोरे, शिला शिवशरण, चंद्रकांत देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शिवाजी सोनवणे, दादासाहेब बाबर, सभापती राणी कोळवले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, सचिन शिवशरण,माजी समाजकल्याण सभापती शिला शिवशरण, संगम धांडोरे, सरपंच वैशाली कोळेकर, उपसरपंच दगडू कोळेकर, बांधकाम कार्यकारी अभियंता प्रदीप माने, समाज कल्याण अधिकारी संतोष जाधव, मबाक जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, नगरसेवक सूरज बनसोडे, निवृत्त अधिकारी भारत शेळके, संयोजक अॅड. सचिन देशमुख, सीताराम सरगर, विलास देशमुख यांची उपस्थिती होती.

    उदघाटनानंतर बोलताना अध्यक्ष कांबळे, अर्जुन गुंडे, श्रीकांत देशमुख यांनी देशामध्ये 6 ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि आहेत त्यात सांगोला तालुक्यातील कोळे गावचा समावेश असून हे प्रेरणादायी आहे, कोळे गाव हे भविष्यात सोलापूर जिल्ह्यातील चैत्यभूमी म्हणून ओळखले जाईल, नव्या पिढीसाठी आदर्शवत असणार अशी भावना व्यक्त केली, याठिकाणी अभ्यासिकेसोबत वसतिगृहाची निर्मिती करावी, त्यासाठी आवश्यक निधीसाठी सर्वजण मिळून आपल्या परीने शासन दरबारी प्रयत्न करण्याचे आवाहन दिले.

    प्रारंभी संयोजक सचिन देशमुख यांनी प्रास्ताविकात स्मारक उभारण्यामागील भूमिका स्पष्ट करत बाबासाहेबांना अपेक्षित युवक शिकली पाहिजेत, अधिकारी झाले पाहिजेत त्यासाठी 48 लाख खर्च अभ्यासिका उभारण्यात येणार असल्याचे सांगितले.

    कार्यकारी अभियंता माने यांनी या प्रकल्पाची अधिक माहिती दिली.या स्मारकासाठी २ एकर जमीन बक्षीस म्हणून देणाऱ्या शहाजी मोरे, मुकुंद मोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.शिवाजी सोनवणे यांनी आपला सेस फंडातील 3 लाखाचा निधी देण्याची घोषणा केली. श्रीकांत देशमुख यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फंडातून ५ लाख देण्याची घोषणा करत कार्यक्रमाला न थांबता निघून गेलेल्या आमदार शहाजी पाटील, दिपक साळुंखे यांच्यावर संताप व्यक्त करत जनता त्यांना जागा दाखवेल असा इशारा दिला. कार्यक्रमाला कोळे ग्रामस्थ, विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.