स्वच्छता हेच अमृत : उद्धव ठाकरे

  सोलापूर : स्वच्छता हेच अमृत आहे. कोरोनाने वैयक्तिक स्वच्छता शिकविली. कोरोनामुक्त गावाबरोबर कचरामुक्त गाव करा, असे आवाहन आज (गुरुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले.

  यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, अपर मुख्य सचिव संजय चहांदे, सह सचिव अभय महाजन आदी प्रमुख उपस्थित होते.

  सोलापूर जिल्ह्याच्या वतीने सरपंच स्वच्छता संवाद थेट वेबसंवाद साधण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, भेंडचे सरपंच डॉ. संतोष दळवी, संवाद सल्लागार सचिन सोनवणे उपस्थित होते.

  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अंगणवाडी सेविकांचे कौतुक केले. पद छोटे असले तरी काम खूप मोठे आहे. आयुष्य कसे जगावे हे गाडगे बाबांनी शिकविले. संत गाडगे बाबांचा आदर्श ठेवून सरपंचानी काम करावे. अनेक पिढ्या सरपंचाचे नाव लक्षात ठेवतील. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना प्रत्येक घरास नळ कनेक्शन देण्यासाठी सरपंचांनी प्रयत्न करावेत. कोरोनाने वैयक्तिक स्वच्छता शिकविली. आपण गावे, पाड्या, वस्ती स्वच्छ ठेवण्यायाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा.

  घनकचरा व्यवस्थापनासाठी गोबरगॅसवर भर द्या : अनिरूध्द कांबळे

  सोलापूर जिल्हयात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन व माझी वसुंधरामधील ग्रामपंचायतीमध्ये गोबरगॅस बसवून गोबरधनचे महत्व जाणून घ्या, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांनी केले.

  कचरामुक्त गाव हेच लक्ष राहील : दिलीप स्वामी

  सोलापूर जिल्ह्यातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी निवडलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कचरा वर्गीकरण, विलगीकरण व कंपोस्ट, सेंद्रिय खत तयार करणेसाठी प्रयत्न राहिल. गांडूळ खत तयार करण्यासाठी आराखड्यात समाविष्ट करणार असल्याचे दिलीप स्वामी यांनी सांगितले.

  कचरामुक्त गावासाठी कृतीसंगम : संतोष धोत्रे

  सोलापूर जिल्ह्यातील ४२५ ग्रामपंचायतीमध्ये गोबरगॅस, घरकुलास शौचालय व सांडपाणी व्यवस्थापनासाठी रोहयोमधून शोषखड्डा असा कृषी विभाग, रोहयो विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अशा चार विभागांचा कृतीसंगम राहणार आहे. माझी वसुंधरामधील ग्राप ना प्राधान्य राहिल असेही अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी सांगितले.

  भेंडचा शोषखड्डा पॅटर्न जिल्हयात राबवू : स्मिता पाटील

  भेंड ग्रामपंचायतीचा सरपंच डाॅ. संतोष दळवी यांनी १५०० रूपयांमध्ये तयार केलेला शोषखड्डा पॅटर्न जिल्ह्यात राबविण्यात येत असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी सांगितले. आपण स्वत: भेंडला भेट देऊन पाहणी करणार असल्याचे सांगितले.