सहकाऱ्याचा झाला न्यूमोनियाने मृत्यू; माणुसकीच्या भावनेने ‘त्यांनी’ केली ५१ हजार रुपयांची मदत

    मोहोळ : मोहोळ तालुक्यातील येवती येथील वाहनचालक लक्ष्मण शिंदे यांचा मृत्यू झाला होता. आता त्यांच्या वारसाला त्यांच्याच कंपनीतील सहकारी वाहनचालकाने ५१ हजार रुपयांची मदत केली असून, शिंदे यांची चार वर्षांची मुलगी माही शिंदे हिच्या बँक खात्यावर ते पैसे जमा केले आहेत.

    तालुक्यातील चिंचोली एमआयडीसी येथील भारत पेट्रोलियम गॅस कंपनीतील ट्रक ड्रायव्हर लक्ष्मण रंगनाथ शिंदे (वय ३८ रा. येवती ता. मोहोळ) यांचा न्युमोनियाने मृत्यू झाला होता. त्यांचे कुटुंब उघड्यावर येऊ नये, म्हणून कंपनीतील २० सहकारी ट्रक ड्रायव्हर यांनी प्रत्येकी एक हजार याप्रमाणे वीस हजार रुपये तर कंपनीतील ट्रक मालक, माथाडी कामगार, गॅस कंपनीतील कामगार व कंपनीतील काही अधिकाऱ्यांनी मिळून एकूण ५१ हजार रुपये माही लक्ष्मण शिंदे हिच्या बँक खात्यावर जमा केले आहेत.

    कोरोना कालावधीमध्ये कित्येक कुटुंबातील कर्ते पुरुष व महिला मृत्युमुखी पडले आहेत. शासनाकडून यांना लवकर मदत मिळणे कठीण आहे. याचा विचार करून ड्रायव्हर व त्यांच्या कंपनीतील इतर सहकाऱ्यांनी लक्ष्मण शिंदे यांच्या वारसांना ही मदत केली आहे. शिंदे यांच्या पश्चात पत्नी व चार मुलीच आहेत. घरातील कर्ता पुरुषच नसल्याने या कुटुंबावर मोठे संकट उभे राहिले होते.

    गॅस कंपनीतील ड्रायव्हर मित्रांनी आपल्या बरोबर गेल्या वीस वर्षांपासून काम केलेल्या शिंदे यांच्या कुटुंबीयांना छोटीसी मदत करावी म्हणून सावळेश्वर येथील अर्जुन सोनटक्के व हसिफखान पठाण यांच्या पुढाकाराने मदतीबाबत इतर ड्रायव्हरशी चर्चा केल्यानंतर मदत करण्याचे सूचले. कंपनीतील सहकाऱ्यांनी मदत केल्यामुळे शिंदे यांच्या कुटुंबीयांनी आभार मानले आहेत.