मोहोळमध्ये महागाईविरोधात काँग्रेसची निदर्शने

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शेतकरी विरोधी तिन्ही कायदे रद्द करावेत यासह पेट्रोल, डिझेल, गॅस आदींची दरवाढ मागे घ्यावी, या मागण्यांसाठी मोहोळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मोहोळ तहसील कार्यालयासमोर केंद्रातील सरकार विरोधात निदर्शने करून बंद पाळून निषेध नोंदविण्यात आला.

    यावेळी मोहोळ तहसीलदार यांच्यामार्फत राष्ट्रपतींना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार हे देशाचे आर्थिक, स्थैर्य, अखंडता, सार्वभौमत्व व्यक्तिस्वातंत्र्य व देशहिता विरोधी कायदे करून देशाचे नुकसान करत आहेत. या निवेदनात अनेक मागण्या करण्यात आलेल्या आहेत. शेतकरी विरोधी नवीन तिन्ही कायदे रद्द करावेत, तसेच कामगार विरोधी कायदे रद्द करावेत, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ मागे घ्यावी.

    यासह तेल डाळी या जीवनावश्यक वस्तूची होणारी कृत्रिम महागाई, साठेबाजी कमी करावी. सरकारच्या स्वायत्त संस्था रेल्वे, विमा कंपन्याची उद्योगपतींना होणारी विक्री थांबवावी, भारत देशात महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करावेत या प्रमुख मागण्यांसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांनी सरकार विरोधी घोषणाबाजी करत निदर्शने करून बंद पाळून आंदोलन केले.

    यावेळी जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष शाहीन शेख, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक देशमुख, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या ता अध्यक्ष सिंधु वाघमारे, यशोदा ताई कांबळे, भीमराव वसेकर, सुरेश शिवपूजे, प्रमोद डोके, संतोष शिंदे, किशोर पवार, विनायक सरवदे, राहुल कुर्डे, सुनिल टिळेकर, कांतीलाल राऊत, मुन्ना हरणमारे, ऍड. शमशाद मुलाणी, ऍड. पी. एस. कुंभार, हेमंत गरड, अनिल पाटील, शाहीर मोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.