सोलापूरच्या सिद्धेश्वर महायात्रेवर कोरोनाचे सावट; नंदीध्वज मिरवणुक काढण्यास मनाई

दरवर्षी लाखोंच्या उपस्थितीत होणारी यात्रा कोरोनामुळे केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत पार पाडण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. महानगरपालिकाने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेची ( Shri Siddheshwar Yatra Rules ) नियमावली जाहीर केली आहे.

    सोलापूर – सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिध्दरामेश्वरांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. एकूण चार दिवस चालणाऱ्या यात्रेच्या आजच्या पहिल्या दिवशी 68 लिंगाना तैलाभिषेक करुन यात्रेला सुरुवात होते. यात्रेचे मुख्य मानकरी असलेले हिरेहब्बू कुटुंबीय योगदंड घेऊन मंदिराकडे रवाना होतात. दरवर्षी पायी चालत हातात नंदीध्वज घेऊन नगरप्रदक्षिणा घातली जाते. मात्र कोरोनामुळे यंदाच्या वर्षी यात्रेवर मोठ्याप्रमाणात निर्बंध घालण्यात आलेत. त्यामुळे पायी नंदीध्वज मिरवणुक काढण्यास प्रशासनाने मनाई केली आहे. मानाचे सातही नंदीध्वजाचे यंदा जागेवरच पूजन केले जाणार आहे. सकाळी 9 वाजता मानकरी हिरेहब्बू योगदंडासह मंदिराकडे रवाना होतील. हिरेहब्बू वाड्यासमोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. केवळ पासधारक व्यक्तींना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे.

    दरवर्षी लाखोंच्या उपस्थितीत होणारी यात्रा कोरोनामुळे केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत पार पाडण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. महानगरपालिकाने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेची ( Shri Siddheshwar Yatra Rules ) नियमावली जाहीर केली आहे. मागील अनेक दिवसांपासून यात्रा कशा पद्धतीने होणार याची उत्सुकता नागरिकांना लागली होती. मात्र, आता यंदाची महायात्रा प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटी प्रमाणे होणार आहे. कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचे सावट यंदाच्या महायात्रेवर आल्याने सिद्धेश्वर भक्तांत नाराजी पसरली आहे.