ST Workers Strike
ST Workers Strike

    टेंभुर्णी : ग्रामीण भागातील महिला व वयोवृद्धांसाठी जीवन वाहिनी म्हणून ओळख असलेली लाल परी अर्थात एसटी व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे अर्थकारणाची नाडी असणारे आठवडी बाजार कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद केले आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील एसटी बस व आठवडी बाजार पुन्हा सुरू करुन ग्रामीण भागाला अर्थिक जीवदान द्यावे अशी मागणी ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी व नागरिकांतून होत आहे.

    सध्या एसटी गाड्या बंद असल्याने ग्रामीण भागाचा शहरी भागाशी असणारा संपर्क तुटल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण ठप्प झाले आहे. शहरी भागात काही कामानिमित्त जायचे म्हटले मोटारसायकलवर जावे लागत आहे. त्यासाठी पेट्रोल दोनशे ते तीनशे रूपयांचे लागते. हे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नसल्याने नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. तर महिला व वयोवृद्ध नागरिकांना दवाखाने, बँक आदि कामासाठी शहरी भागात येण्यासाठी बस बंद असल्याने कुठलीच सोय होत नाही. यामुळे त्यांना जादा पैसे देऊन खाजगी वाहनाने अथवा गावातील तरूणांना मोटारसायकल वरुन घेऊन जाण्यासाठी विनवणी करावी लागत आहे.

    शासनाच्या निर्णयानुसार सर्व राजकीय, सामाजिक कार्यक्रम, लग्न समारंभ, अनेक प्रकारचे व्यवसाय, दुकाने, सलून दुकाने, दारू दुकाने आदींना परवानगी दिली आहे. मात्र, आठवडी बाजाराला अद्याप परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे छोटे व्यावसायिक, हातगाडीवाले यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण आठवडी बाजारामध्ये शेतीपूरक व्यवसायाची उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असून, बाजार बंद असल्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.