ऊस वाहतूकदारांसाठी पंढरीत धडक मोर्चा; पाच तास वाहतूक ठप्प, सुमारे शंभर ट्रॅक्‍टर मोर्चात सामील

  पंढरपूर : राज्यभरातील ऊस वाहतूक दारांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जनशक्तीचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे २१ सप्टेंबर रोजी सुमारे १०० ट्रॅक्टर व शेकडो ऊस वाहतूकदारांना घेऊन पंढरपूर शहरातून मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. ऊस उत्पादक आणि कारखाना संचालक मंडळ यांच्यातील महत्वाचा दूवा असणार्‍या ऊस वाहतूकदारांच्या समस्या मांडण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे यांनी सांगितले.

  मोर्चा तहसील कचेरीसमोर पोहचल्यानंतर बोलताना अतुल खूपसे म्हणाले, ऊस तोडणी कामगारांना उघड्यावर पाडण्यासाठी हार्वेस्टर तसेच मोठे ट्रॅक्टर अशा साधनाचा वापर करून ऊस कारखानदारांनी ऊसतोडणी क्षेत्रात प्रवेश केला. यासाठी हार्वेस्टरला ५० टक्के अनुदान देखील दिले. एफआरपीसाठी आंदोलन करणारऱ्या अनेक शेतकरी संघटना आहेत. मात्र ऊस वाहतूक करणार्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाहीत. वाहतूकदारांना अपघात झाल्यास संबंधित कारखान्याने आर्थिक मदत करावी, अशी मागणी खुपसे यांनी केली. मोर्चात राज्यातील अनेक भागातून ऊस वाहतूकदार मोठ्या संख्येने सामिल झाले होते.

  ऊस तोडणी करणारऱ्या टोळीच्या मुकदमाला दिलेली उचल हि टोळी पळून गेली, तर रक्कम बुडीत खात्यात जमा होते आणि त्याचा राग वाहतूकदारावर काढला जातो. अनेक कारखान्यामध्ये वाहतूकदारांना मारहाण देखील झाली आहे. एक तर कर्ज काढून ट्रॅक्टर खरेदी करायचा आणि गेल्या १० वर्षात ऊस वाहतूकदाराला ट्रॅक्टरसाठी केवळ पाच लाख रूपये उचल दिली जाते. त्यामुळे उचल म्हणून देणार्‍या रक्कमेची जबाबदारी टोळी मुकादम आणि संबंधित कारखान्याने घ्यावी, अशी आमची मागणी आहे.

  – अतुल खुपसे, प्रदेशाध्यक्ष, जनशक्ती संघटना

  पोलीस प्रशासन-मोर्चेकऱ्यांत बाचाबाची

  पंढरपूर शहरामध्ये या मोर्चाला सुरूवात झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने मोर्चा अडवून या मोर्चातील ट्रॅक्टर चालकांकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याचे सांगत, मोर्चा अडवल्यानंतर मोर्चेकरी आणि पोलीसांमध्ये बराच काळ वादावादी झाली. मोर्चा काही पुढे सरकेना. तेव्हा अतुल खुपसे यांनी, पंढरपूर शहरामध्ये किती जणांचा परवाना तपासता, असा जाब विचारत यापुढे वाहन परवान्याविषयी आंदोलन सुरू करणार असल्याचे स्पष्ट करत कडक इशारा देताच पोलीसांची भंबेरी उडाली आणि त्यांनी मोर्चाला मोकळी वाट करून दिली. मोर्चामध्ये सहभागी झालेले तरूण हे प्रसंगाचे गांभिर्य न जपता अतिउत्साहात धिंगाणा करत असल्याचे चित्र दिसत होते.