सोलापूरात हजारो विडी कामगार महिलांचा एल्गार; कुंभकोणी यांच्या भूमिकेमुळे कामगार संतप्त

    सोलापूर : सोलापूरात हजारो महिला विडी कामगारांनी रोजगार बचावासाठी एल्गार पुकारला आहे. बुधवारी जिल्हा परिषद मुख्यालयासमोरील उपोषणस्थळी १० हजारांपेक्षा अधिक महिलांची गर्दी दिसून आली. माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आली. मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.

    धुम्रपानामुळे कोरोना होत आहे, असा तर्क लावत स्नेहा मार्जाडी यांनी मुबंई उच्च न्यायालयात विडी विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात यावी म्हणून २० एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य सरकार आणि अन्य यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल केली असून, यावर पाच वेळा सुनावणी झाली आहे.

    २५ जून रोजी मुख्य न्यायाधीश अंतिम आदेश देणार आहेत. याबाबत २४ जूनपर्यंत राज्य सरकारची बाजू ऐकण्याची वेळ दिली आहे. त्याआधी राज्य सरकारने आपले म्हणणे सादर करणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची मुदत दिली. जेणेकरून महाराष्ट्र राज्यातील साडेतीन लाख विडी कामगारांचा रोजगार वाचवण्यासाठी कामगारांची बाजू मांडली पाहिजे.

    या प्रमुख मागणीसाठी या सिटूच्या वतीने कामगार नेते आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली राज्य महासचिव ऍड एम. एच. शेख, नगरसेविका कामिनी आडम, युसूफ मेजर, नसीमा शेख, सुनंदा बल्ला, सिद्धप्पा कलशेट्टी, अनिल वासम, अकिल शेख यांच्या उपस्थितीत १० हजार विडी कामगार महिलांचे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

    राज्य सरकारने जर विडी कामगारांच्या हिताचे प्रतिज्ञापत्र दाखल न केल्यास ५० हजार महिलांना घेऊन होम मैदानावर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कामगार नेते आडम मास्तर यांनी दिला आहे.