पाण्याच्या पाईपलाईन विस्तारीकरणाला मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी शंभरकर

  मोहोळ : सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईन विस्तारीकरणाला मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, केवळ जमिनीचा हक्क संपादन केला आहे. त्याबदल्यात मोठ्या प्रमाणात मोबदला ही दिला आहे. पाईपलाईन जमिनीखालून असल्याने नुकसान होणार नाही. भांडण, वादावादी करून काम करणे योग्य नाही, असे सांगत या पाईपलाईनच्या माध्यमातून विकासाची गती वाढण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

  उजनी धरणातून सोलापूर साठी वाढीव पाणी पुरवठा पाईपलाईनचे काम सुरू करण्यात आले आहे त्या पाईपलाईन साठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत या संदर्भात मोहोळ येथील कै. शहाजीराव पाटील सभागृहात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

  यावेळी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक ढेंगळे, कार्यकारी अभियंता शेखर भांडेकर, मोहोळचे नायब तहसीलदार राजशेखर लिंबारे, गटविकास अधिकारी गणेश मोरे, कंपनीचे प्रकल्प अधिकारी श्रीनिवास राव, जीवन प्राधिकरण विभागाचे उपअभियंता कोळी आदी सह शंभर ते दीडशे शेतकरी उपस्थित होते.

  यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले की, मोहोळ तालुक्यातून सोलापूर शहराकडे जाणाऱ्या पाईपलाईनची लांबी ४२ किमी आहे. जवळपास १४ गावामधून ही पाईपलाईन जाते पाईपलाईनच्या जागेचा वापर संबंधित शेतकरी करू शकतात परंतु त्यावर बांधकाम करू शकत नाहीत. दीड महिन्यात संबंधित शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे आश्वासनही यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले.

  यावेळी शेतकऱ्यांनी मोबदल्या संदर्भात, पाईपलाईनच्या कामाबाबत, जमीन हस्तांतरण बाबत विविध प्रश्न विचारले त्यावर जिल्हाधिकारी शंभरकर व उपजिल्हाधिकारी पाटील यांनी योग्य प्रकारे समाधानकारक उत्तरे देत भांडण व वादावादी न करण्याचे आवाहन केले.

  दरम्यान, मोहोळ तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांनी सदरची पाईपलाईन ही मोहोळ शहरातून जात आहे. या पाईपलाईनला मोहोळवासीयांसाठी १ इंची नळकनेक्शन द्यावे व शहरातील ज्या भागातून सदरची पाईपलाईन जाईल त्या भागातील रस्त्याची गटारीसह पुनर्दुरुस्ती महापालिकेने स्वतःहून करून द्यावी आदी मागण्या केल्या.

  यावेळी प्रा. माणिक गावडे, सुनील ठेंगील, दशरथ माळी, पटोशा घोलप, नामदेव पाटील, अजित क्षीरसागर, पिंटू कदम, आदी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.