पूर्ववैमनस्यातून दोन गटात हाणामारी; १३ जणांवर गुन्हा दाखल

    सोलापूर : मागील भांडणाच्या कारणावरून बेडर पुलाजवळ असलेल्या हेजनपुरात दोन कुटुंबात लोखंडी पाईप, कात्री याचा वापर करून मारामारी झाली. यात दोन्ही गटातील अनेक जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

    नूतन मोहन फटफटवाले (रा. नळबाजार चौक,सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्या आपल्या चुलत सासू यांच्या देवकार्याचे कार्यक्रम संपवून आईच्या घरी जात असताना रोहन कजागवाले, सागर कजागवाले, शुभम कजागवाले, सरस्वती कजागवाले, लक्ष्मी हजारीवाले, (रा.सर्वजण हैजनपुरा,सोलापूर) व केशव चौधरी (राहणार बेडर पूल सोलापूर) या सर्वांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच भांडण सोडवण्यास आलेल्या नातेवाईकांना दमदाटी करून कात्रीने मारून जखमी केले, अशी फिर्याद दिली आहे. तर सरस्वती कजागवाले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मागील जुन्या भांडणाचा राग मनात धरून नूतन फटफटवाले, बन्सी प्रताप फटफटवाले, भीम प्रताप फटफटवाले, गणेश बंशी फटफटवाले, दत्त शिवसिंगवाले व इतर २ अनोळखी इसम (रा.सर्वजण लोधी गल्ली,४ नंबर शाळेजवळ सोलापूर) या सर्वांनी मिळून काठी, कात्री, लोखंडी पाईपने मारहाण केली.

    तसेच फिर्यादीच्या मुलाच्या डोक्यात वार करून जखमी केले. दोन्ही घटनेची नोंद सदर बाजार पोलिस ठाण्यात झाली असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड व पोलीस नाईक लोंढे हे करीत आहेत.