सोलापुरात माजी आमदाराच्या जुगार अड्ड्यावर धाड; जुगार खेळताना रंगेहात अटक

सोलापुरात होटगी रस्त्यावरील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून कर्नाटकातील माजी आमदार रवी पाटील यांच्यासह 31 जणांना अटक केली. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल संच व जुगाराचे साहित्य असा एकूण सहा लाख 57 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा जुगार अड्डा स्वतः पाटील हे चालवित होते, असे पोलिसांनी सांगितले(Former Karnataka MLA arrested for gambling in Solapur).

    सोलापूर : सोलापुरात होटगी रस्त्यावरील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून कर्नाटकातील माजी आमदार रवी पाटील यांच्यासह 31 जणांना अटक केली. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल संच व जुगाराचे साहित्य असा एकूण सहा लाख 57 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा जुगार अड्डा स्वतः पाटील हे चालवित होते, असे पोलिसांनी सांगितले(Former Karnataka MLA arrested for gambling in Solapur).

    रवी शंकरप्पा पाटील (65) हे पोलिसांकडील नोंदीनुसार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. नंतर राजकारणात सक्रिय होऊन शेजारच्या कर्नाटकातील इंडी (जि. विजापूर) येथून सलग तीनवेळा आमदार झाले होते. एकदा त्यांनी सोलापूर लोकसभेची निवडणूकही लढविली होती. तत्पूर्वी, ते सोलापूर महापालिकेवरही निवडून गेले होते.

    स्वतःची टोळी तयार करून खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, अपहरण, खंडणी यासह इतर अनेक गुन्हे रवी पाटील यांच्यावर नोंद होते. त्यांच्यावर तत्कालीन टाडा, रासुका आदी कायद्याखालीही कारवाई झाली होती. बलात्काराच्या खटल्यात त्यांना सोलापूरच्या सत्र न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षाही सुनावली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयात त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले होते.

    काँग्रेस, राष्ट्रवादी, जनता दल, भाजप, शिवसेना आदी सर्व प्रमुख पक्षांशी त्यांची जवळीक राहिली आहे. सोलापूरचे तत्कालीन पोलिस आयुक्त शहीद अशोक कामटे यांनी रवी पाटील यांच्या मुसक्या आवळताना केलेला बळाचा वापर त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता.