माढ्याच्या माजी नगराध्यक्षा ऍड. मीनल साठे यांना रणरागिनी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

  माढा : जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या तथा माढ्याच्या माजी नगराध्यक्षा ऍड. मीनल दादासाहेब साठे यांना मा दुर्गा फाऊंडेशन, शकुन ट्रस्ट गोवा आणि स्वरकुल ट्रस्ट पुणे संचलित, नवरात्री स्पेशल कल्चरल प्रोग्राम आणि A ग्रँड ऍवार्ड सेरमणी यांच्याकडून देण्यात येणारा रणरागिनी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

  विविध क्षेत्रात समाजात उल्लेखनीय कर्तृत्व सिद्ध करुन दाखवणार्‍या महिलांना प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. माढ्यासह परिसरातील गावात ऍड. मीनल साठे यांनी महिला सक्षमीकरणासाठी राबविलेले विविध कार्यक्रम, नाविन्यपूर्ण योजनेची दखल घेत साठे यांची पुरस्कारासाठी निवड झाली.

  या अगोदर देखील ऍड. साठे यांना विविध संस्थाचे ७  पुरस्कार प्रदान करण्यात आलेले असुन हा जाहीर झालेला ८ वा  पुरस्कार आहे. ऍड. साठे या स्व.सहकार महर्षी गणपतराव साठे, स्व. मंदकिनी साठे यांच्या विचाराचा वारसा घेऊन माजी आमदार धनाजीराव साठे, दादासाहेब साठे यांच्या मार्गदर्शनातुन राजकारणाला समाजकारणाची जोड देत आल्या आहेत.

  माढा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा तसेच जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ही दोन्ही पदे सांभाळत त्यांनी विकासकामांचा डोंगर उभारला आहे. ऍड. साठे कार्यतत्पर महिला नेतृत्व असल्याने महिलांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. १७ ऑक्टोबर रोजी पणजी येथे विशेष समारंभात गोव्याचे मुख्यमंत्री यांच्यासह अन्य प्रमुख  मान्यवर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ऍड. साठे यांना पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात असून, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

  हा पुरस्कार केवळ माझ्यासाठीच नसुन समस्त महिलांना हा पुरस्कार मी अर्पित करते. महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत. यासाठी प्रियदर्शनी महिला मंडळाच्य माध्यमातून विविध कार्यकम योजना राबविल्या यातुन अनेक महिला सक्षम झाल्यात. आणखी भरपूर काही कामे महिलांसाठी करायची आहेत. कामे करीत राहिले की समाजाकडून दखल घेतलीच जाते.

  – ऍड. मीनल साठे, माजी नगराध्यक्षा, माढा