नगरपरिषदेत ‘त्या’ सात गावांचाही समावेश करा : डाॅ. धवलसिंह पाटील

    अकलूज : जुन्या अकलूजमध्ये ८ गावांचा समावेश होता. मग आता अकलूज नगरपरिषद करण्यासाठी देण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये फक्त माळेवाडीचाच अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यामुळे इतर ७ गावे विकासापासून वंचित राहतील. त्यांनाही नगरपरिषदेमध्ये समाविष्ट करुन घ्यावे, अशी मागणी डाॅ. धवलसिंह मोहीते पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. यावेळी माणिक मिसाळ, सतिश, पालकर देशमुख, ज्योतीताई कुंभार, सुधीर रास्ते, मयुर माने, बबन शेंडगे, बापू देवकुळे उपस्थित होते.

    सरकारचा निर्णय मान्य नाही

    डाॅ. मोहिते पाटील म्हणाले, सन १९२२ साली स्थापन करण्यात आलेल्या अकलूज ग्रामपंचायतीमध्ये माळेवाडी, माळीनगर, यशवंतनगर, आनंदनगर, सवतगव्हाण, चौंडेश्वरवाडी, बागेवाडी व संग्रामनगर या गावांचा समावेश होता. १९८५ साली नगर परिषद होऊ नये, याकरीता अकलूज ग्रामपंचायतीचे विभाजन करुन प्रत्येक गावची वेगळी ग्रामपंचायत करण्यात आली. या सर्व गावांची मिळून लोकसंख्या २७ हजार एवढी होती. आज २०११ च्या जनगणने नुसार अकलूजसह इतर गावांची लोकसंख्या १ लाख २ हजार ४०० एवढी होते.

    मग नगरपरिषदेचा प्रस्ताव देताना फक्त माळेवाडीचाच त्यात समावेश का करण्यात आला आहे. इतर गावांनाही समाविष्ठ करुन घेतले असते तर त्यांचाही अकलूज बरोबर विकास झाला असता. परंतु राजकीय गणिते साध्य करण्यासाठी अकलूजचा िवचार करण्यात अाला नाही. जनसेवा संघटनेला हा अन्याय मान्य नाही. नगरपरिषद करायची असल्यास जुन्या अकलूजमधील सर्व गावे त्यात समाविष्ट करण्यात यावीत अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करु, असा इशारा काॅग्रेस नेते डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी दिला आहे.