मोठ्या संख्येने झाडे लावण्यापेक्षा लावलेले झाड जगवणे महत्वाचे : दत्तात्रय भरणे

    सोलापूर : कोविडच्या या कठीण काळात सोलापूर जिल्हा परिषदेने राज्याला आदर्श ठरणारे अनेक उपक्रम राबवून मोठे काम केले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही सीईओ स्वामी यांनी राबविलेल्या उपक्रमांची दखल घेतली आहे. याबद्दल मी सीईओ स्वामी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. आजची ही “एक पद एक वृक्ष” मोहिमसुध्दा अगदी कल्पक मोहीम आहे. झाडे मोठ्या संख्येने लावण्यापेक्षा लावलेले प्रत्येक झाड जगवणे महत्वाचे आहे, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

    सोलापूर जिल्हा परिषदेच्या “एक पद एक वृक्ष” मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री भरणे यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषदेच्या नेहरूनगर येथील कुक्कुट प्रशिक्षण केंद्र येथे करण्यात आला. यावेळी भरणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, कार्यकारी अभियंता बांधकाम प्रसाद कदम, प्रदीप माने, सार्वजनिक वन विभागाचे संघ्यारानी बंडगर कार्यालयीन अधीक्षक, सहाय्यक वन संरक्षक बाबा हाके, कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे पंडित भोसले, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा सुनील कटकधोंड, समाज कल्याण अधिकारी जाधव, कार्यक्रम अधिकारी बालकल्याण जावेद शेख आदी प्रमुख उपस्थित होते.

    मान्सूनचे आगमन झाले की शासन स्तरावर व सामाजिक स्तरावर वृक्षारोपणाची लगबग सुरू होते. राज्यात दरवर्षी या कालावधीत लाखो वृक्षांचे रोपण केले जाते. परंतु, मोठ्या प्रमाणात वृक्ष लावल्यानंतर सर्वच रोपे जिवंत राहतात असे नाही. रोपटे लावल्यानंतर त्याच्या संवर्धनाकडे वैयक्तिक लक्ष देवून संगोपन करणे आवश्यक आहे. यासाठी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्याऐवजी प्रत्येकाने एकच वृक्ष लावून त्याचे जतन करावे ही संकल्पना पुढे आली व त्यातूनच सीईओ स्वामी यांनी “एक पद एक वृक्ष” हे अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

    जिल्हा परिषद मुख्यालय, पंचायत समितीमध्ये पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांची संख्या १४ हजार होते. ग्रामपंचायतींमध्ये सरपंच अधिकारी व कर्मचारी संख्या दोन हजार असून, मानधनावरील कर्मचारी संख्या दोन हजार असे एकूण १८ हजार एवढी संख्या होते. उर्वरित दोन हजार संस्था-पतसंस्था यांचेकडून लावण्यात येतील. एकंदरीत २० हजार वृक्ष लागवड करून ते पूर्णपणे जगवले जातील, असे या उपक्रमाचे स्वरूप आहे.

    या मोहिमेचा शुभारंभ आज पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. शुभारंभाप्रसंगी कुक्कुट प्रशिक्षण केंद्र येथील परिसरात एकूण ५०० रोपांची लागवड करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रंजना कांबळे, विवेक लिंगराज, रफिक शेख, सचिन चव्हाण, उमाकांत कोळी, पुनम नरसोडे, विद्या हायनाळकर, विद्या शिंदे, जाधव, महेश नारायणकर, राम कांबळे, शकुंतला जाधव आदींनी परिश्रम घेतले.