मोहोळ तालुक्यातील कोरवली-अंत्रोळी रस्त्याचे लोकार्पण

    मोहोळ : कोरवली ता. मोहोळ येथील दूरदृष्टीचे लोक व त्यांचे प्रगल्भ विचार व त्यांना शिवानंद अण्णा पाटील यांचे मार्गदर्शन यामुळेच दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या साह्याने कोरवली ते अंत्रोळी हा रस्ता तयार करता आला. या कंपनीच्या कामाला अडवणूक न करता त्यांच्याच सहकार्याने हे रस्त्याचे काम कोरवली ग्रामस्थांनी पूर्ण करून घेतले इतर २८ गावांनी देखील कोरवली ग्रामस्थांचा आदर्श घेऊन आपल्या गावाचा खुंटलेला विकास साधावा, असे कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांंनी सांगितले.

    कोरवली ते अंत्रोळी या रस्त्याचे लोकार्पण लोकशक्ती शुगरचे व्हाईस चेअरमन शिवानंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी सपोनि माने बोलत होते. यावेळी डॉ. अमोल पाटील, डॉ. राहुल पाटील, शिवानंद म्हमाणे, साधू पाटील, सिद्धाराम म्हमाणे, ग्रामविकास अधिकारी संजय आदमिले, सरपंच सुज्ञांनी पाटील, उपसरपंच शशिकांत कस्तुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

    कै. विठ्ठल मारुती म्हमाणे यांच्या स्मरणार्थ कोरवली ते अंत्रोळी या रस्त्याचे काम दिलीप बिल्डकॉन कंपनीने पूर्ण करून दिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम प्रलंबित होते. या रस्त्यावर गावातील अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. मात्र इथे चांगला रस्ता नसल्याने पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत होती. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल होत असल्याने बैलगाडीला देखील जाता येत नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना चिखल तुडवत जावे लागत असे. मात्र, आता हा रस्ता लोकसहभाग व दिलीप बिल्डकॉन कंपनीने तयार करून दिल्याने परिसरातील शेतकऱ्यांची शेतीला जाण्यासाठी व शेतातील माल गावाकडे आणण्यासाठी चांगली सोय झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने दिलीप बिल्डकॉन कंपनीचे प्रदीपकुमार सिंग, अभिषेक दुबे, पवन कुमार शुक्ला, ब्रीजेश तिवारी, शंकर भालेराव, गुरुसिंग या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश म्हमाणे यांनी केले. तर आभार दयानंद पाटील यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दयानंद तारके, महासिद्ध वाले, अमोल गेंगाणे, दत्ता भीमदे, मुन्ना म्हमाणे, दत्ता म्हमाणे आदींनी परिश्रम घेतले.