भाषेच्या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाकडे रोजगाराच्या नजरेने पाहावे : डॉ. दीपक तुपे

    अकलूज : येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि २०२१ चा हिंदी दिवस कार्यक्रम (ऑनलाईन) साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर (स्वायत्त) येथील हिंदी विभाग प्रमुख डॉ. दीपक तुपे हे होते. त्यांनी तंत्रज्ञान आणि हिंदी विषयाचे विद्यार्थी या विषयावर बोलताना तंत्रज्ञानाच्या विविध माध्यमांची माहिती दिली आणि हिंदी विषयाच्या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून नोकरीच्या संधी प्राप्त करून घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

    प्रत्येक काळानुसार तंत्रज्ञान विकसित होत असते कारण माणसाची जिज्ञासूवृत्ती निरंतर नवनवीन अविष्कार करुन आपले जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करीत आली आहे. आज तंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. आज तंत्रज्ञान काळातही जे रोजगार अबाधित आहेत ते म्हणजे भाषाधारित रोजगार. म्हणजेच मस्तिष्क आधारित रोजगार हे नव्या युगाची संधी आहे. हेही भाषेच्या विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात घेणे गरजेचे आहे. अध्ययन आणि अध्यापन करताना तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन कसे विकसित केले जाऊ शकते याचे ही विस्ताराने विवेचन त्यांनी केले.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. दत्तात्रय बागडे होते. त्यांनी तंत्रज्ञान ही काळाची गरज बनली आहे आणि भाषेच्या विकासासाठी त्याचा निश्चितच फायदा होईल. हिंदी विषयाचे विद्यार्थी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून स्वतः चा विकास करून घेतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांची ओळख हिंदी विषयाचे प्रा निवृत्ती लोखंडे यांनी करून दिली तसेच सुत्र संचालन व आभार प्रदर्शन विभाग प्रमुख डॉ. अपर्णा कुचेकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, शि.प्र.मं.संचालिका स्वरुपाराणी मोहिते-पाटील, संस्थेचे सचिव अभिजित रणवरे, सह-सचिव हर्षवर्धन खराडे-पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या ऑनलाइन समारंभासाठी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख तसेच धर्मशाला (हिमाचल प्रदेश), केरळ, गुरूदासपूर (पंजाब), मोगा (पंजाब), दिल्ली, पंजाब नॅशनल बँकेचे अधिकारी यांच्यासह महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यातील एकूण ११५ प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी सहभागी झाले होते.

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सलीम शेख, डॉ. अण्णासाहेब नलवडे, प्रा. शिवाजी राजगुरु, नितीन सुरवसे आणि महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचेही मोलाचे योगदान लाभले.