जामगावमध्ये मराठवाडा ७३ वा मुक्तिसंग्राम दिन साजरा

    माढा : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात माढा तालुक्यातील जामगावसह सोलापूर जिल्ह्याचे फार मोठे योगदान लाभले आहे. मुक्तापूर स्वराज्याची राजधानी असलेल्या माढा तालुक्यातील जामगावने या लढ्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली असून, या गावात ७३ वा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन शुक्रवारी (दि.१७) उत्साहात साजरा झाला.

    दरम्यान जामगावकर ग्रामस्थांना ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्वातंत्र्यसेनानी कै.विठ्ठ्लराव पाटील यांच्या स्मारक होण्याची प्रतिक्षा लागुन राहिली असून, शासन दरबारातून या प्रश्नी हालचाली गतिमान होणे गरजेचे आहे. प्रारंभी स्वातंत्र्यसेनानी कै. विठ्ठलराव पाटील यांच्या वाड्यावर तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

    सोलापूर जिल्हा दुध संघाचे माजी संचालक राजेंद्र चवरे यांच्या हस्ते तर सरपंच सुहास पाटील जामगावकर, दादासाहेब पाटील, संतोष जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले. कै.विठ्ठ्लराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सरपंच तथा माढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपभापती संजय पाटील जामगावकर व दादासाहेब पाटील यांनी मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामात जामगावच्या असलेल्या योगदानाची माहिती देतानाच विठ्ठ्लराव पाटील यांच्या स्मारकाच्या प्रश्नी शासनदरबारी पाठपुरावा सुरु आहे, असे सांगून मोठा ऐतिहासिक वारसा गावाला लाभला असल्याचे सांगताना विठ्ठ्लराव पाटील गावचे भूषण असल्याचे म्हटले.

    राजेंद्र चवरे यांनी ऐतिहासिक वास्तूचे जतन करुन ही वास्तू नवीन पिढीला प्रेरणादायी ठरणार असल्याचे म्हटले. याप्रसंगी मधुकर चव्हाण, रामचंद्र पाटील, प्रफुल्ल पाटील, प्रमोद पाटील, रविराज पाटील, मोहन पाटील, प्रताप पाटील, रणजित पाटील, अमोल चव्हाण, समाधान चव्हाण, शाहीर चव्हाण, दिपक गायकवाड, अर्जुन ताकभाते, संतोष राऊत, सारिका गायकवाड आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.