पडोळकरवाडी येथील दरोडा व खून घटनास्थळाला कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरिक्षक हिरेमठ यांची भेट

महिलेच्या अंगावरील दागिने ओरबडून घेवून गळा दाबून खून केल्याचे निदर्शनास आले.या घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. मागील तीन वर्षापुर्वी सोड्डी येथेही दागिने ओरबडून एका वृध्द महिलेचा खूनाचा प्रकार घडला होता. तत्कालीन पोलिस अधिक्षक विरेश प्रभू यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून तात्काळ आरोपींना जेरबंद केले होते.

    मंगळवेढा : पडोळकरवाडी येथे दरोडेखोरांनी नकुशा कोंडीबा मदने या ६५ वर्षीय महिलेच्या अंगावरील दागिने ओरबडून घेवून तीचा खून केलेल्या घटनास्थळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरिक्षक सुधीर हिरेमठ यांनी आज भेट देवून साक्षीदार तपासून घटनेमागची सखोल माहिती जाणून घेतली.दरम्यान,या घटनेच्या तपासासाठी डी.वाय.एस.पी.मंगळवेढा व सोलापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांची विशेष पथके तयार केली असल्याचे सांगण्यात आले.

    यातील मयत नकुशा मदने यांची मुले ऊसतोडीला गेल्यामुळे त्या एका कुडाच्या खोलीत एकटयाच रहात होत्या. त्याचबरोबर त्यांचा शेळीपालन व्यवसाय होता. दि. ६ रोजी त्या रात्री ९.३० वा. जेवण करून झोपल्या होत्या. दि.७ च्या सकाळी ९.०० वा. शेळयांचा ओरडण्याचा मोठा आवाज येत असल्याने फिर्यादीची भावजय रत्नाबाई ह्या तेथे गेल्यानंतर घराचा दरवाजा बंद असलेला दिसला.त्यांनी दार उघडून आत पाहिले असता नकुशा यांच्या कानाजवळ रक्त आलेले दिसल्याने त्यांनी आक्रोश केला.हा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमल्यावर त्यांनी पाहिले असता त्यांच्या अंगावरील दागिने ओरबडून घेवून गळा दाबून खून केल्याचे निदर्शनास आले.या घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. मागील तीन वर्षापुर्वी सोड्डी येथेही दागिने ओरबडून एका वृध्द महिलेचा खूनाचा प्रकार घडला होता. तत्कालीन पोलिस अधिक्षक विरेश प्रभू यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून तात्काळ आरोपींना जेरबंद केले होते. पडोळकरवाडी येथील घटनेवरून सोड्डी घटनेची पुनरावृत्ती झाल्याची आठवण परिसरातील नागरिकांना आली.हया घटनेचे वृत्त राज्यभर पसरले असून कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरिक्षक सुधीर हिरेमठ यांनी सदर घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट देवून साक्षीदार तपासले. तसेच या घटनेबाबत पोलिस अधिकार्‍यांना काही महत्वाच्या सूचनाही केल्या.

    यावेळी डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक सर्जेराव पाटील,पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे आदी उपस्थित होते.या दरोडा व खूनाचा तपास करणे पोलिसांच्या दृष्टीने एक आव्हानात्मक असून यासाठी डी.वाय.एस.पी.मंगळवेढा -१ टिम,स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर-1 टिम,मंगळवेढा पोलिस स्टेशन -1 टिम अशा टिम तयार करण्यात आल्या असून या घटनेचा शोध घेण्यासाठी त्या कार्यरत झाल्या आहेत.