गल्लीबोळातून उगवले भावी आमदारांचे पिक ; आगामी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आ. भारतनाना भालके यांचे निधन झाल्यानंतर होणाऱ्या संभाव्य पोटनिवडणुकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. मंगळवेढा - पंढरपूर तालुक्यात सध्या अनेक छोटे - मोठे नेते, आता पुढच्या आमदारपदी आपलीच वर्णी लागणार, या अविर्भावात तयारी करत आहेत. तर त्यांचे कार्यकर्ते या नेत्यांना 'भावी आमदार आले' अशी आरोळी देऊन त्यांचे स्वागत करताना दिसत आहेत.

राजेश शिंदे ,पंढरपूर : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आ. भारतनाना भालके यांचे निधन झाल्यानंतर होणाऱ्या संभाव्य पोटनिवडणुकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. मंगळवेढा – पंढरपूर तालुक्यात सध्या अनेक छोटे – मोठे नेते, आता पुढच्या आमदारपदी आपलीच वर्णी लागणार, या अविर्भावात तयारी करत आहेत. तर त्यांचे कार्यकर्ते या नेत्यांना ‘भावी आमदार आले’ अशी आरोळी देऊन त्यांचे स्वागत करताना दिसत आहेत.

भारतनाना भालके

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून तीन वेळा विजय मिळवून हॅट ट्रिक साधणारे आ. भारतनाना भालके यांचे नुकतेच अल्पशा आजारामुळे निधन झाले. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक लागणार आहे. पंढरपूर व मंगळवेढा या मतदारसंघात गेल्या चाळीस वर्षात भालके आणि परिचारक या दोन गटाचे वर्चस्व राहिलेले आहे. ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपालिका तसेच तालुक्यातील अर्थकारण सांभाळणाऱ्या आर्थिक संस्था व सहकारी क्षेत्रात या दोन गटाचे वर्चस्व राहिले आहे. कोरोना काळात या दोन्ही गटाचे वरिष्ठ प्रमुख नेते माजी आ. सुधाकरपंत परिचारक व विठ्ठल परिवाराचे नेते आ. भालके यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे या दोन्ही गटाचे कार्यकर्ते नेतृत्वहीन झाल्यासारखे वातावरण दोन्ही तालुक्यात पसरल्याचे दिसते आहे.

भगीरथ भालके

अशा परिस्थितीत पोटनिवडणूक लागल्यास सक्षम उमेदवार नसल्यामुळे पुढची आमदारकी आपल्याच खिशात आहे, अशा भ्रमात अनेक जुने नेते फिरत आहेत. यापूर्वी विधानसभा निवडणूकीत अनेकदा नशीब आजमावणारे नेते आता या निवडणुकीतही पुन्हा आमदारकीची लॉटरी लागते का? हे पाहण्यासाठी मैदानात उतरतील. दिवंगत आ. भालके यांच्या पश्चात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी विठ्ठल परिवाराने भारतनाना यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांच्यावर सोपवली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांनी विठ्ठल परिवाराला एकजुटीने राहण्याची सुचना करीत आपले लक्ष या मतदार संघावर असल्याचे संकेत नुकतेच दिले होते. परंतु पवार साहेबांनी विठ्ठल परिवारातल्या काही नेत्यांशी जवळीक साधल्याने या नेत्यांनाही आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. प्रत्यक्षात सध्या कोणत्याच नेत्याची निवडणूक लढण्याची क्षमता दिसत नाही. तर दुसरीकडे भालके यांच्या निधनामुळे सहानुभूतीची लाट, जर उमेदवारी मिळाली तर भगीरथ भालके यांना मिळण्याची शक्यता जास्त असल्याने सध्याच्या परिस्थितीत संभाव्य उमेदवार म्हणून भगीरथ भालके यांची निवड होणे अपेक्षित आहे.

माजी आ. सुधाकरपंत परिचारक

या मतदारसंघावर जरी भालके- परिचारक यांचे वर्चस्व असले तरी दिवंगत आमदार भालके यांनी जनसामान्यांशी जोडलेली आपली नाळ आणि सामान्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता, अशी बनवलेली आपली ओळख, याचा फायदा विठ्ठल परिवाराला होणार हे निश्चित.मात्र आता तालुक्याला मोठे नेतृत्व नसल्याचे दिसू लागल्याने मतदार संघातील गल्लीबोळातून पुढारी म्हणून मिरवणारे नेते आमदारकीची स्वप्ने पाहू लागले आहेत. अशा नेत्यांना त्यांचे कार्यकर्ते देखील स्वागत करताना भावी आमदार आले, असे अशा आरोळ्या ठोकत आहेत. या स्वागताने भारावलेले नेते देखील आपल्या कार्यकर्त्यांना जेवणावळी घडवून आणत आहेत. हे सर्व पाहून सर्वसामान्य मतदारांची चांगलीच करमणूक होत आहे.