जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार : गणेश पाटील

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : आगामी निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती नगरपालिका आणि नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचाचं झेंडा फडकणार आहे. निवडणुकीसंदर्भात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सतर्क राहून आपल्या झेडपी गटात व पंचायत समिती गणात नगरपालिका वार्डात बारकाईने लक्ष देऊन प्रारुप मतदार याद्या तपासून कामाला लागा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी केले.

    राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक टेंभुर्णी येथे पार पडली. आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली.

    पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष गणेश पाटील म्हणाले, मतदार यादीत काही ठिकाणी चुकीच्या प्रारूप याद्या तयार केल्या असल्या तरी हरकती घेऊन दुरुस्त कराव्यात व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जागा जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. तालुकाध्यक्ष यांनी बुथ कमिट्या नेमावेत, गाव तिथे शाखा उपक्रम राबविण्यात यावे, असेही गणेश पाटील म्हणाले.

    यावेळी माढा युवक तालुकाध्यक्ष संभाजी पाटील निरीक्षक शरद लाड प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर, प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, प्रदेश सचिव मोहित गायकवाड, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात माळी व सर्व जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, जिल्हा कार्यकारणी सदस्य, तालुकाध्यक्ष, तालुका कार्याध्यक्ष, शहराध्यक्ष, शहर कार्याध्यक्ष उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा सचिव अतुल खरात यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवक माढा तालुकाध्यक्ष संभाजी पाटील, टेंभुर्णी शहराध्यक्ष मयूर काळे यांनी सहकार्य केले व आभार जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील यांनी मानले.