कोरोना प्रतिबंधात हलगर्जीपणा; जि.प.च्या ९ अधिकाऱ्यांना नोटीसा जारी

तालुकास्तरावर समिती गठित करुन इतर विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सक्रीय सहभाग घेऊन ग्रामस्तरीय पथकामार्फत सदर पॉझीटीव्ह रुग्णांच्या सहवासितांचा शोध घेणेबाबत सुचना दिलेल्या होत्या.यासाठी तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी समन्वय अधिकारी म्हणून काम करण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते.

    सोलापूर:जिल्ह्यात कोविड १९ रुग्णांच्या सहवासितांचा प्रभावीपणे शोध घेण्याचे प्रमाण अत्यंत असमाधानकारक व कोविड १९ बाधित दर जास्त असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील ९ गट विकास अधिकारी व ५ तालुका वैद्यकीय अधिकारी यांना कामात हलगर्जी व निष्काळपणा दाखविल्याबद्दल कारणे दाखवा नोटिस बजावून २४ तासांच्या आत तात्काळ खुलासा करण्याचा आदेश दिला आहे.कोरोनावर मात करुन आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी हे कोरोना प्रतिबंधक कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कारावाई मोडमध्ये आल्याने खळबळ उडाली आहे.

    सध्या कोविड १९ चा प्रसार वेगाने वाढत आहे.परंतु ४ मार्च २०२१ ते १८ मार्च २०२१ या पंधरा दिवसामध्ये कोविड १९ सहवासितांचा शोध घेण्याचे काम प्रभावीपणे केले नसल्याचे दिसून येत आहे. तालुकास्तरावर समिती गठित करुन इतर विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सक्रीय सहभाग घेऊन ग्रामस्तरीय पथकामार्फत सदर पॉझीटीव्ह रुग्णांच्या सहवासितांचा शोध घेणेबाबत सुचना दिलेल्या होत्या.यासाठी तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी समन्वय अधिकारी म्हणून काम करण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते.

    प्रत्येक तालुक्यातील बाधित व्यक्तीच्या सहवासितांचा शोध घेणेसाठी पर्यवेक्षिय पथकामार्फत सदरील कार्याचा आढावा समन्वय अधिकारी यांनी नियमितपणे घेणे आवश्यक होते. जेणेकरुन कोविड १९ च्या चाचण्यांच्या प्रमाणात वाढ होऊन कोरोनाची साखळी खंडित होण्यास मदत होईल.परिणामी व्यक्तींचा शोध वेळीच लागल्याने जिल्ह्यातील मृत्यू दर कमी होईल. अशा प्रकारच्या सुचना देण्यात आल्या होत्या. परंतु सदर कामात वरिष्ठांचे आदेशाचे पालन करीत नसल्याचे दिसून आले आहे.कोविड १९ साथरोग प्रतिबंधाचे काम करताना अत्यंत निष्काळपणा केल्याचे निदर्शनास आल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग अधिनियम १८९७ अन्वये कारवाई का करु नये? व कर्तव्यात कसूर केले म्हणून म.ना.से.(वर्तवणूक) नियम १९७९ मधील ०३ चा भंग केल्याने शिस्तभंगाईची कारवाई का करण्यात येऊ नये? याबाबतचा खुलासा नोटिस मिळालेपासून २४ तासाच्या आत सादर करावा.

    सदर खुलासा मुदतीत व समाधानकारकपणे प्राप्त न झालेस शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या नोटिसमध्ये देण्यात आला आहे.सदर नोटिस पंढरपूर , दक्षिण सोलापूर , उत्तर सोलापूर , मंगळवेढा , माळशिरस , माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोट या ९ तालुक्याच्या गट विकास अधिकारी व करमाळा , माढा , बार्शी , मोहोळ व दक्षिण सोलापूर या ५ तालुक्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत.