निमगाव येथील शेतकऱ्याची केळी इराणला; सव्वा एकरात साडेचार लाखांचे उत्पन्न

  कुर्डुवाडी : स्थानिक बाजारपेठ, खासगी व्यापारी केळी मालाला देत असलेल्या भावापेक्षा विदेशात जादा भाव मिळत असल्याने आता शेतकरी चांगल्या गुणवत्तेच्या केळी फुलवित विदेशात पाठवित आहेत. निमगांव टें (ता.माढा) येथील शेतकरी नवनाथ बापूराव शिंदे यांच्या शेतातील केळी इराण येथे निर्यात करण्यात येत आहे. त्यांच्या उच्च गुणवत्तेच्या निर्यातक्षम केळीला ११ रुपये प्रतिकिलो दराने भाव मिळाला आहे.
  अकोले खुर्द (ता. माढा) येथील मनोज चिंतामण यांच्या नमन फ्रुट्स कंपनीमार्फत नाशिकच्या सह्याद्री फार्मस् प्रोड्युसर कंपनीकडून ही केळी इराणला निर्यात होत आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना विदेशामध्ये निर्यातीद्वारे नवा मार्ग सापडला आहे.
  निमगांव टें ता.माढा येथील नवनाथ बापुराव शिंदे या ३२ वर्षीय तरूण शेतकऱ्याने गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात वडील बापूराव शिंदे, आई हावडाबाई शिंदे व पत्नी अनिता शिंदे यांच्या मदतीने आपल्या सव्वा एकर क्षेत्रात केळीच्या जैन जातीच्या एकूण १६५० झाडांची जोड ओळ पद्धतीने लागवड केली. लगतच्या दोन ओळींतील अंतर चार फूट आणि मध्ये आठ फुटांचा पट्टा व दोन झाडांतील अंतर पाच फूट ठेऊन लागवड केली. घरी उपलब्ध शेणखत, रासायनिक खतांची शिफारशीत मात्रा लागवडी वेळी दिली.  ठिबकद्वारे  खतांचा समतोल राखत जैविक आणि सेंद्रिय विद्राव्य खते देत, झाडांची आवश्यक ती काळजी घेतली.
  खतांचे, पाण्याचे व्यवस्थित व्यवस्थापन केल्याने साधारणपणे एका घडाचे वजन २५ ते २८  किलो या प्रमाणात भरत असल्याने ५० गुठ्यांत  केळीचे ४० ते ४५  टन उत्पादन निघणे अपेक्षित आहे. त्यामुळे एकूण उत्पन्न चार ते साडेचार लाखांच्या आसपास मिळणार आहे. आजपर्यंत या पिकासाठी ९५ हजार रुपये खर्च आला. खर्च वजा जाता ५० गुठ्यांत शिंदे यांना निव्वळ नफा तीन ते साडेतीन लाख रूपये मिळत आहे.
  तसेच केळी बागेत झेंडू व भुईमूगाचे आंतरपीक घेण्याचा प्रयोग शिंदे यांनी करून कमी कालावधीत, कमी श्रमात ४० हजारांची चांगली कमाई साधली व  केळीचा उत्पादन खर्च कमी केला. झेंडूमुळे बागेतील सूत्रकृमींवर प्रतिबंधक उपाय साधले. त्यांना केळी फळबाग लागवडीसाठी दादासाहेब शिंदे व संतोष चट्टे यांचे मार्गदर्शन लाभले. कुटुंबांसमवेत शेतीत कष्ट करून मजुरी खर्च वाचवायचा, पशुपालनातुन मिळणाऱ्या शेणखताचा वापर करून गुणवत्तापूर्ण उत्पन्न काढणारे नवनाथ शिंदे मिळणाऱ्या नफ्याबाबत समाधानी  आहेत.
  दर्जेदार रोपांची निवड, सेंद्रीय खतांचा वापर, पाणी आणि विद्राव्य खतांचे तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य नियोजन केल्यामुळे झाडांची चांगली वाढ होऊन एकसारख्या घडांचे त्यांना उत्पादन मिळाले. केळीची प्रतही चांगली आहे. सध्या स्थानिक बाजारपेठेत केळीला ६ रूपये दर आहे. निर्यातक्षम उच्च गुणवत्तेच्या केळीला ११ रूपये भाव मिळत असल्याने निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेण्याकडे माढा तालुक्यातील शेतकऱ्यांची कल आहे.
  – मनोज चिंतामण, व्यापारी, नमन फ्रुट कंपनी
  रोपे, खते, कीडनाशके, केळी रोपांसाठी पट्ट्या, ठिबक सिंचन आणि पीक व्यवस्थापन मजुरी असा एकरी ९५ हजार रूपये खर्च आलेला आहे.  ४० ते ४५ टन केळीचे उत्पादन हाती येणार आहे. सरासरी दहा ते अकरा हजार रुपये प्रति टन असा दर मिळत आहे. खर्च वजा जाता  सव्वा एकरात सरासरी तीन ते साडेतीन लाखांचे निव्वळ उत्पन्न केळीतून मिळणार आहे.
  – नवनाथ बापुराव शिंदे, केळी उत्पादक शेतकरी.