कोणत्याही खेळासाठी पोष्टीक आहार महत्वाचा : डॉ. भारती संभाजीराव भोसले

डॉ. भारती भोसले म्हणाल्या, प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा मा.कु. स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांनी खेळाडूंना शिबीरासाठी मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. १४ वर्षाखालील खेळाडूंसाठी आहार या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले की, एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे खेळाचे गुण येत असतात.

    अकलूज : कोणत्याही खेळातील यश हे गुणवत्ता, उत्तम आरोग्य व पौष्टीक आहारावर अवलंबून असते. तुम्ही आहारात काय आणि किती प्रमाणात खाता हे महत्वाचे आहे. प्रताप क्रीडा मंडळाने आयोजन केलेल्या क्रीडा शिबीरात खेळाडूंना मोफत पौष्टीक आहार दिला जात आहे. खेळाडूंचा आहार हा समतोल असावा व खेळाडूंनी भरपूर पाणी प्यावे. फळांचे, भाज्यांचे भरपूर सेवन करावे. मीठ, मैदा, गोड पदार्थ, बेकरी पदार्थ कमी प्रमाणात खावे व खेळाडूंनी चहा, कॉफीचे सेवन टाळून पाणी, नारळपाणी, दूध, फळांचे ज्यूस प्यावेत. यशस्वी खेळाडू, उत्तम आरोग्य व तंदुरुस्त होण्यासाठी पोषक आहार महत्वाचा असल्याने रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील महिला गृहविज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापिका व आहारतज्ञ डॉ. भारती संभाजीराव भोसले, प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि. १ ते १० डिसेंबर २०२१ या कालावधीत आयोजित केलेल्या निवासी प्राथमिक क्रीडा प्रशिक्षण व निवड शिबीरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. भारती भोसले बोलत होत्या. यावेळी प्रताप क्रीडा मंडळाचे सचिव पोपटराव भोसले-पाटील, मेघा लांडगे, संचालक यशवंत माने-देशमुख, बिभीषण जाधव, राजेंद्र देवकर, क्रीडा शिक्षक, खेळाडू उपस्थित होते.

    डॉ. भारती भोसले म्हणाल्या, प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा मा.कु. स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांनी खेळाडूंना शिबीरासाठी मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. १४ वर्षाखालील खेळाडूंसाठी आहार या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले की, एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे खेळाचे गुण येत असतात. शिक्षण प्रसारक मंडळ नेहमीच विद्यार्थ्यांना सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशिल असते. आपणाला स्वास्थ आरोग्यासाठी नेहमीच पोषक घटक आवश्यक असतात. काही पोषक घटकामूळे जास्त उर्जा मिळते. उर्जा ही वय व वजन यावर अवलंबून असते. यासाठी प्रामुख्याने मांसाहार, क्षारासाठी कॅल्शीयम असावे. अन्नधान्य, फळे, पालेभाज्या खाव्यात. वेगवेगळ्या भाज्यामुळे अन्नघटक मिळतात. जेवणाच्या योग्य वेळा पाळाव्यात. चुकीच्या आहाराच्या सवयी टाळाव्यात. डाळी, मोड आलेले कडधान्य, बदाम, काजू, शेंगदाणे, फुटाणे, अंडी खावीत. मुलींनी आहारात विशेष काळजी घ्यावी. मुलींनी लोह (आयर्न) व हिमोग्लोबीन वाढीसाठी कॅल्शीयमयुक्त पदार्थ खावेत. हिरव्या पालेभाज्या, तृणधान्य, दुध, दुग्धजन्य पदार्थ, तूप खावे. संत्री, मोसंबी, आवळा, पेरु यांचे सेवन करावे. जेवणात कच्या पालेभाज्या असाव्यात. मुलींना रोज २७०० कॅलरीज तर मुलांना ३२०० कॅलरीज लागतात.

    भाजीचा पर्याय डाळी होत नाही. भाजी रोज खावीच. चहा आणि कॉफीतले घटक अन्नाच्या घटकातील शोषणाला अडथळा निर्माण करतात. यासाठी चहा-कॉफी टाळावेत. दूध प्यावे. कोणतेही फळ,कोणतीही भाजी आपणासाठी आहे. त्याचा आनंद घ्या. चांगले खेळाडू व्हायचे तर आहारही पौष्टीक, समतोल व वेळेवर घेणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी दंगल या चित्रपटाचे व हुसेन बोल्ट या रनरचे उदाहरण व माहिती दिली. तर काही चित्रफिती दाखविल्या. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. सुत्रसंचालन किरण सूर्यवंशी यांनी केले.

    सकाळ सत्रातील विद्यार्थ्यांच्या उत्तेजक कसरती, स्टॅडींग स्ट्रेचींग, रन अ‍ॅन्ड वॉक, वॉर्मअप, फिटनेस ड्रील आदी खेळप्रकार व व्यायामप्रकार घेण्यात आले. यावेळी प्रताप क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष प्रताप पाटील, शाखा प्रमुख, क्रीडा शिक्षक उपस्थित होते. तर दुपारसत्रात विद्यार्थ्यांना सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याची सहल घडविण्यात आली. कारखान्याच्या वतीने रसपान देण्यात आले. याबद्दल प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने कारखान्याचे चेअरमन  जयसिंह मोहिते-पाटील, व्हा. चेअरमन, सर्व संचालक, अधिकारी आदींचे आभार व्यक्त करण्यात आले.