सोलापूरात ओबीसी आंदोलनाचा भडका; भाजप आमदारासह महापौरांना अटक

    सोलापूर : ओबीसी राजकीय आरक्षण आबाधित ठेवण्यासाठी भाजपाकडून जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मार्केट यार्ड परिसरातील नॅशनल हायवेवर विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

    ‘आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. कितीही गुन्हे दाखल केले तरी ओबीसी आरक्षणसाठी लढा सुरूच राहील, अशी भूमिका आमदार देशमुख यांनी मांडली. आंदोलनादरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर हल्ला चढविण्यात आला. महाविकास आघाडी सरकार ओबीसी विरोधी सरकार असल्याच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित हाेते. तर जिल्ह्यातील भाजप आमदारांनी चक्काजाम करुन लक्षवेधी केले.