महामार्गावरील भीषण अपघातात एक ठार, दोघे जखमी ; मोहोळ तालूक्यातील बेगमपूर येथील घटना

गिरीश माने व त्यांचे मित्र हे सोलापूरहून एका खासगी कामानिमित्त एमएच १३ डीटी १८९१ या कारमधून सांगोला येथे गेले होते. काम संपवून ते रात्री उशिरा परत सोलापूरला निघाले होते. दरम्यान, सोलापूरहून मंगळवेढ्याच्या दिशेने सिमेंट घेऊन भरधाव वेगाने व चुकीच्या दिशेने निघालेल्या ट्रकने (एमएच १३ डीक्‍यू १२७०) महामार्गावरील बेगमपूर येथील स्टेट बॅंकेसमोर या कारला समोरून जोरदार धडक दिली.

    बेगमपूर : सोलापूरहून मंगळवेढ्याकडे महामार्गावरील दुभाजकावरून भरधाव वेगाने निघालेल्या ट्रकने कारला समोरा समोर जोरदार धडक दिल्याने एकजण जागीच ठार झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना मोहोळ तालूक्यातील बेगमपूर येथे घडली आहे. महामार्गावरील बेगमपूर गावाजवळील स्टेट बॅंकेसमोर सोमवारी (ता. २१) रात्री एकच्या सुमारास भीषण आपघाताची घटना घडली. सुनील बनसिद्ध वाघमारे (वय ३१, रा. टिळकनगर, मजरेवाडी, सोलापूर) असे अपघातातील मृताचे नाव असून, गिरीश ब्रह्मदेव माने (रा. अरविंद धाम पोलिस वसाहत, सोलापूर) व हर्षवर्धन मलिक सर्वगोड (वय ३५, रा. गजानन नगर, मजरेवाडी सोलापूर )अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.

    याबाबत कामती पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गिरीश माने व त्यांचे मित्र हे सोलापूरहून एका खासगी कामानिमित्त एमएच १३ डीटी १८९१ या कारमधून सांगोला येथे गेले होते. काम संपवून ते रात्री उशिरा परत सोलापूरला निघाले होते. दरम्यान, सोलापूरहून मंगळवेढ्याच्या दिशेने सिमेंट घेऊन भरधाव वेगाने व चुकीच्या दिशेने निघालेल्या ट्रकने (एमएच १३ डीक्‍यू १२७०) महामार्गावरील बेगमपूर येथील स्टेट बॅंकेसमोर या कारला समोरून जोरदार धडक दिली. यामुळे कारमधील चालकाशेजारी बसलेले सुनील वाघमारे हे जागीच गतप्राण झाले. अन्य दोघांच्या हात, पाय व डोक्‍याला जबर मार लागला. ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने महामार्गावरील दुभाजक तोडून ट्रकने कारला समोरून जोरदार धडक दिली. परिणामी सोलापूरकडे निघालेली कार उलट दिशेला काही अंतर फरफटत नेली व घटनास्थळापासून सुमारे दोनशे मीटर अंतरावर ट्रक थांबला. घटनेनंतर ट्रक चालकाने पलायन केले .

    दरम्यान, घटनेनंतर काही वेळातच कामती पोलिस घटनास्थळी पोचले. मध्यरात्रीनंतरची वेळ असूनही महामार्गावर घडलेल्या या अपघाताच्या मदतीसाठी गावातील ग्रामसुरक्षा दलातील लखन ताकमोगे व अमर गोडसे, संजय चव्हाण, पपूल शेख, गजानन गुंडाळे या युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकून पडलेल्या प्रथम दोघांना बाहेर काढून उपचारासाठी तत्काळ सोलापूरला पाठविले. अन्य एकाला अक्षरशः कारचा दरवाजा गॅस कटरने कापून बाहेर काढले. या अपघातात कारचे सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक हर्षा कुमार कांबळे (रा. अरविंदधाम पोलिस वसाहत, सोलापूर) यांनी कामती पोलिसांत फिर्याद दिली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बापू दुधे पुढील तपास करीत आहेत.