कुर्डुवाडीत जाणवतेय पार्किंग सुविधेची गरज

वाहनांची संख्या दिवसेंदिवस बेसुमार वाढत आहे. त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरविण्याकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे गाडीचे पार्किंग कोठे करायचे, असा प्रश्‍न येथील नागरिक व वाहनधारकांना रोजच भेडसावत आहे.

    कुर्डुवाडी : वाहनांची संख्या दिवसेंदिवस बेसुमार वाढत आहे. त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरविण्याकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे गाडीचे पार्किंग कोठे करायचे, असा प्रश्‍न येथील नागरिक व वाहनधारकांना रोजच भेडसावत आहे. शहरातील पार्किंग व्यवस्थेचा प्रश्न मोठा गंभीर असून, नगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील गावठाण भाग व मुख्य बाजारपेठेचा विचार केला असता येथील शासकीय कार्यालये किंवा व्यापारी संकुल बांधताना तळमजला हा पार्किंग सुविधेसाठी असणे गरजेचे झाले आहे.

    कुर्डुवाडी हे रेल्वेचे जंक्शन असून, हजारो प्रवासी याठिकाणाहून मोठ्या प्रमाणात ये-जा करित असतात. तसेच याठिकाणी नगरपालिकेशिवाय असणारी पंचायत समिती, प्रांत कार्यालय ही कार्यालये असल्यामुळे शहरात कामानिमित्त येणाऱ्या ग्रामीण भागातील लोकांचा राबता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पार्किंग समस्या ही नेहमीच भेडसावत असते.

    नगरपालिका प्रशासनाने शहरातील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या खासगी तसेच व्यावसायिक जागेत बांधकाम परवाना देण्याअगोदर पार्किंग व्यवस्था केली आहे का हे पाहणे गरजेचे आहे. खासगी जागेत निदान जागा मालकाची वाहने तरी त्याच्या स्वतःच्या जागेत असावीत नाही तर आज शहरात अनेक व्यापाऱ्यांकडे मोठ्या गाड्या आहेत पण त्याची पार्किंग व्यवस्था त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे वाहने दारासमोर रोडवर पार्किंग केली जातात. त्यामुळे इतरांना नाहक त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे शहरातील बेशिस्त पार्किंग व्यवस्था बोकाळली आहे. याकडे धड पालिका प्रशासनाचे लक्ष आहे ना पोलिस प्रशासनाचे.

    हा दीर्घकाळ प्रलंबित असणारा प्रश्न आहे. ज्या जागा ओपनप्लेस नगरपालिका म्हणून आरक्षित आहेत. त्या जागा योग्य पेमेंट देऊन हस्तांतरीत करुन घ्याव्यात आणि त्याठिकाणी पार्किंगची सुविधा करावी.

    – डाॅ. विलास मेहता, अध्यक्ष, कुर्डुवाडी व्यासपीठ