रुग्णसेवा हीच आरोग्य अधिकाऱ्यांची प्राथमिकता : दिलीप स्वामी

    सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व राष्ट्रीय बाल आरोग्य योजनेतील वैद्यकीय अधिकारी यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी डॉ. शितलकुमार जाधव जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. अनिरुद्ध पिंपळे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, डॉ. विलास सरवदे जिल्हा आयुष अधिकारी हे उपस्थित होते.

    स्वामी यांनी सर्वप्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावरील सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व राष्ट्रीय बाल आरोग्य योजनेतील वैद्यकीय अधिकारी यांनी कोविडच्या अवघड परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा केली. याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये स्वामींनी पुढीलप्रमाणे सूचना दिल्या.

    १) आपण सर्वजण या परिस्थितीत चांगले काम करीत आहातच परंतु सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असला तरी विशिष्ट तालुका, गाव व विशिष्ट भागात रुग्ण संख्या नियमितपणे कमी-जास्त होत आहे. यावर लक्ष केंद्रित करून अशा भागातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग व संपूर्ण लसीकरण या बाबींकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे.

    २) जिल्हा मुख्यालयातील यंत्रणेने समुदाय आरोग्य अधिकारी यांचे वेतन व भत्ते वेळेत होतील याची दक्षता घ्या.

    ३) समुदाय आरोग्य अधिकारी हा उपकेंद्र स्तरावरील महत्त्वाचा घटक आहे. तेव्हा समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या उपकेंद्रातील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांचेसह समन्वय साधून नागरिकांमध्ये कोविड प्रतिबंधक लसीबाबत आणखी जनजागृती करण्याची गरज आहे. लसीकरणाबाबत गाव पातळीवर वयोगट निहाय आजपर्यंत लसीकरण झालेले व लसीकरण करण्याचे राहिलेले नागरिकांचे सर्वेक्षण करून सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून घेण्याबाबतचे नियोजन करावे.

    गावात येणारे स्थलांतरित लोकांवर जसे की ऊस तोडणी कामगार लक्ष ठेवून त्यांचे लसीकरण झाले किंवा कसे हे तपासून त्यांचे लसीकरण करून घेण्यावर भर द्यावा. त्याचप्रमाणे त्यांच्या बालकांची आरोग्य तपासणी याकडेही कटाक्षाने लक्ष द्यावे.

    ४) कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन SAM,MAM बालकांच्या पालकांचे प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे.
    ५) वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे व केंद्राचे सुशोभीकरण करून घ्यावे. आरोग्य केंद्र परिसरात वृक्षारोपण करून त्या सर्व रोपांचे संवर्धन करावे.

    ६) प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणत्याही परिस्थितीत व स्वच्छता सहन केली जाणार नाही तसे आढळल्यास संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

    ७) प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपापल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात पूर्णवेळ उपस्थित राहण्याची दक्षता घ्यावी कामकाजाच्या वेळेत कोणी गैरहजर आढळला तर त्याची गय केली जाणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. असा इशाराही यावेळी सीईओ स्वामी यांनी दिला.

    जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी रक्तदाब, कर्करोग व मधुमेह असलेल्या नागरिक त्यांचा औषधोपचार नियमित घेतात किंवा कसे यावर लक्ष ठेवून त्यांना असलेल्या आजाराचा औषधोपचार नियमित घेण्याबाबत समुपदेशन करावे. जेणेकरून कोविडच्या तिसर्‍या लाटेत मृत्यूदर कमी ठेवण्यात यश येईल. त्याचप्रमाणे गाव पातळीवर समुदाय आरोग्य अधिकारी यांनी योगासनाचे सत्र नियमितपणे सुरू राहतील याकडे लक्ष द्यावे. औषधोपचार अपेक्षा प्रतिबंध केव्हाही चांगला हे सूत्र लक्षात घेऊन योगासनावर भर द्यावा.