सरकारच्या अक्षम्य पापाविरुद्ध जनतेची लढाई : ऍड. शेख

  सोलापूर : आरक्षणाचे जनक लोकराजा प्रजाहितदक्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती. तसेच १९७५ मध्ये भारतीय लोकशाहीवर सर्वात प्रखर आघात करणारी आणिबाणी तसेच दिल्ली येथे शेतकरी तीन कृषी काळ्या कायद्यांच्या विरोधात लाखो शेतकरी तब्बल ७ महिने झाले, इंचभरही जागा सोडली नाही. अजूनही अविश्रांत लढाई सुरू आहे. या तीन विषयावर आपल्याला चिंतन आणि मंथन करण्याची गरज आहे.

  शाहू महाराज आपल्या राज्यात सर्वांना समान न्याय आणि लोकशाहीची मूल्ये जपले. पण अशा लोकशाहीवर सत्ताधाऱ्यांनी २६ जून १९७५ साली प्रखर आघात करून लोकशाहीला नख लावण्याचे काम केले. याचा कित्ता आज पुन्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गिरवत आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुध्द आवाज उठवला की त्यांच्यावर दमनशाही होत आहे. विद्यार्थी, युवा,महिला,मानव अधिकार कार्यकर्ते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक आणि चळवळीतील कार्यकर्ते यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून देशद्रोही ठरवण्याचा जाणीव पूर्वक प्रयत्न चालू आहे.

  तसेच न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी लष्कर आणि पोलीस यंत्रणा तैनात करून रोज त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती चालू आहे. ही एक प्रकारची जनतेविरुद्ध सरकारची अघोषित आणिबाणी आहे. सरकारच्या या अक्षम्य पापाविरुद्ध जनतेची ही लढाई असे मत सिटूचे राज्य महासचिव ऍड. एम.एच.शेख यांनी व्यक्त केले.

  दिल्ली येथील संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने शेती वाचवा लोकशाही वाचवा या देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली. त्या अनुषंगाने सोलापूर डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने माजी नगरसेविका कॉ. नसीमा शेख यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.

  यावेळी आंदोलकांनी शेती वाचवा, लोकशाही वाचवा, देश वाचवा, तीन कृषी काळे कायदे रद्द करा, कामगार कायद्यातील प्रतिगामी बदल मागे घ्या, चार श्रम संहिता रद्द करा, सर्वांना मोफत कोरोना प्रतिबंध लस द्या. शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या. किसान एकता जिंदाबाद ! कामगार एकता जिंदाबाद ! अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडले.

  यावेळी युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष, विक्रम कलबुर्गी, जिल्हा सचिव अनिल वासम, राज्य उपाध्यक्ष अशोक बल्ला, युसूफ मेजर, व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी, सुनंदा बल्ला, शकुंतला पानिभाते, लिंगव्वा सोलापुरे, शंकर म्हेत्रे, विल्यम ससाणे, वसीम मुल्ला, सलीम मुल्ला, बाबू कोकणे,मुरलीधर सुंचू,किशोर मेहता, अप्पाशा चांगले, शहाबुद्दीन शेख,रवींद्र गेंट्याल, बालाजी गुंडे, मल्लेशम कारमपूरी,बजरंग गायकवाड, युसूफ शेख, प्रकाश कुऱ्हाडकर, सायाना मदगल, नितीन माकम, सुरेश गुजरे,हणमंतू पेद्दी,मोहन कोक्कुल, अंबाजी दोंतुल, विनायक भैरी, शिवा श्रीराम किशोर गुंडला, सेनापती मरेड्डी, गोपाळ जकलेर आदी उपस्थित होते.