पंढरपुरात ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईची शक्यता ; बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने होणार खडखडाट

पंढरपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्याचा भराव पुरामुळे आलेल्या पाण्यामुळे वाहून गेलेला आहे. या भरावाची तात्पुरती दुरुस्ती म्हणून मातीचा बांध घालण्यात आलेला आहे. पाटबंधारे विभाग विभागाने त्याची दुरुस्ती करण्यासाठी निधी वर्ग केला आहे. मात्र काम पुर्ण करण्यासाठी काही कालावधी लागेल,असे मुख्याधिकारी मांनोरकर यांनी सांगितले. 

  पंढरपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने उजनी धरणातून सोडलेले पाणी बंधाऱ्यात फार काळ टिकून राहणार नाही, त्यामुळे भर उन्हाळ्यात पंढरपूरवर पाणीटंचाईची तलवार लटकत आहे. या बंधाऱ्याचे देखभाल व दुरुस्ती करण्याचे काम जरी नगरपालिकेकडे असले, तरी भराव फूटून दोन महिने उलटल्यानंतर ही अद्याप दुरुस्ती साठी नगरपालिका उदासीन असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील सांगोला व पंढरपूर या गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी जुन्या दगडी पुलाच्या वरच्या बाजूस प्रशासनाने बंधारा बांधून अडलेल्या पाण्यावर पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. मात्र सुमारे दोन महिन्यापूर्वी या बंधाऱ्याच्या पश्चिमेला असणार्‍या बाजूचा भराव वाहून गेला आहे. बंधारा पूर्ण भरल्यानंतर या भागातील वाळू पाण्याखाली जाते. त्यामुळे बंधारा पोखरण्याचे काम वाळूमाफियांनी केले की, या बंधाऱ्याच्या पुढील भागातील शेतकऱ्यांनी केले, हा संशोधनाचा विषय आहे. कारण सध्या देखील उरलेल्या पाण्यावर शेतीपंपाच्या पाईप टाकून पाणी उपशाचे काम परिसरातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

  नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या मते सदर भराव पुराच्या पाण्याने वाहून गेला असावा. मात्र सद्यस्थिती पाहता जर उजनीतून उन्हाळ्यातील पाणीपुरवठ्यासाठी पाणी सोडण्यात आल, तर पाणी अडवण्यासाठी केलेली तात्पुरती मातीच्या भरावाची सोय या पाण्याबरोबर वाहून जाणार आहे. आणि त्यामुळे होणार पंढरपूर व सांगोल्याला ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई राहणार आहे.
  सदर बंधारा दुरुस्ती करण्यासाठी निवडणूक आचारसंहिता आडवी येणार असून किमान दोन मे पर्यंत म्हणजे निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरु करणे शक्य नसल्याचे दिसत आहे. यामुळे नगरपालिका प्रशासन यावर काय उपायोजना करते, याकडे पंढरपूरकरांचे यांचे लक्ष लागले आहे.

  पंढरपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्याचा भराव पुरामुळे आलेल्या पाण्यामुळे वाहून गेलेला आहे. या भरावाची तात्पुरती दुरुस्ती म्हणून मातीचा बांध घालण्यात आलेला आहे. पाटबंधारे विभाग विभागाने त्याची दुरुस्ती करण्यासाठी निधी वर्ग केला आहे. मात्र काम पुर्ण करण्यासाठी काही कालावधी लागेल,असे मुख्याधिकारी मांनोरकर यांनी सांगितले.

  सध्या उजनीतून पिण्याच्या पाण्यासाठी बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. वाळूतस्करांनी वाळू काढल्यामुळे बंदराच्या बाजुची माती वाहून गेली आहे. मात्र यावर आजच निर्णय घेऊन पाणीसाठा वाढविण्याच्या दृष्टिकोनातून नगरपालिका प्रशासन प्रयत्न करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही काळजी करू नये.

  -नगराध्यक्षा साधना भोसले