ओबीसींचे आरक्षण संपुष्टात यायला पंतप्रधान मोदी, फडणवीसच कारणीभूत; काँग्रेसच्या प्रकाश वालेंचा आरोप

    सोलापूर : केंद्रातील भाजपप्रणित मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयाला ओबीसीची आकडेवारी मागितली होती. पण मोदी सरकारने ती आकडेवारी न दिल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर ओबीसींचे आरक्षण संपविणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने आंदोलन करून निषेध करण्यात आले.

    यावेळी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात ओबीसींचे आरक्षण संपविणाऱ्या भाजपा सरकारचा निषेध असो, ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण विरोधी भाजपा सरकारचा निषेध असो, ओबीसीविरोधी भाजप सरकारचा निषेध असो, मोदी ‘तेरी हिटलरशाही नहीं चलेगी’ अशी जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आले. तसेच यावेळी नरेंद्र मोदींच्या अघोषित आणीबाणीस काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता म्हणून सदैव विरोध करीन अशी शपथ पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतली.

    प्रकाश वाले म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचे भाजपाचा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आरक्षण संपविण्यासाठीच काम करत आहे.

    तसेच देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांना पत्र लिहून ओबीसींचा इम्पिरीकल डेटा देण्याची मागणी केली. पण केंद्राने तो दिला नाही. केंद्राने ओबीसींचा डेटा दिला नाही, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्याला सध्याचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे. ओबीसींचे हे राजकीय आरक्षण घालवून ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा भाजपाचा डाव आहे. भाजपच्या या ओबीसीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आज आंदोलन करण्यात आले.

    या आंदोलनात प्रकाश वाले, सोमपा गटनेते चेतन नरोटे, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, नगरसेवक प्रवीण निळाळजे, हाजी तौफिक हत्तुरे, विनोद भोसले, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, नगरसेविका परवीन इनामदार, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, अरुण साठे, देवाभाऊ गायकवाड, लक्ष्मीकांत साका, बाबूराव म्हेत्रे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.