खड्ड्यात गवत लावून महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा निषेध

    सोलापूर : महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या निद्रिस्त कारभारामुळे, निकृष्ट, संथगतीने चालू असलेल्या विकासकामामुळे शहरात सर्वत्र खड्डे, दलदल, चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, नागरिकांना याचा त्रास होत आहे. म्हणून आज सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव नगरसेवक विनोद भोसले, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, युवराज जाधव, राहुल गोयल, गोविंद कांबळे, महेश लोंढे, सुभाष वाघमारे, राजेंद्र शिरकुल, किरण राठोड, यांनी नवी पेठेत खड्ड्यात आणि चिखलात गवत लावून महापालिकेतील सात्ताधारी भाजपाचा निषेध करण्यात आला.

    यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांनी सत्ताधारी भाजपवर टीका करताना म्हणाले की, सोलापूर महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या भोंगळ कारभारामुळे, अजगरासारखे सुस्त पडलेल्या निष्क्रिय, आणि दुर्लक्ष करणाऱ्या भाजपामुळे सोलापूर शहरात निकृष्ट आणि अतिशय संथ गतीने चालू असलेले विकासकामे शहरात सर्वत्र खड्ड्याचें, चिखलाचे, धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसामुळे सर्वत्र दलदल, चिखल झाले आहे. यामुळे वाहनचालक, व पादचाऱ्यांना चालणे मुश्किल झाले आहे. अनेक नागरिकांना आरोग्याचे समस्या निर्माण होत आहेत. अनेकांच्या घरात पाणी शिरले. अनेक ठिकाणी वाहने खड्ड्यात व चिखलात रुतत आहेत, वाहने घसरून अपघात घडत आहेत.

    गेल्याच आठवड्यात एका मुलाचा मृत्यू झाला आहे, नवी पेठ सारख्या गजबजलेल्या व्यापार पेठेत गेले वर्षभर विकास कामे अतिशय संथगतीने चालू आहे. सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नाही, ते आपल्या गटातटाच्या भांडणात व्यस्त आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना व बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होत असून आपला जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे.

    भाजप पदाधिकारी आणखी किती बळी घेणार आहेत. म्हणून सोलापूर महापालिकेतील निद्रिस्त भाजप पदाधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी आज रोजी नवी पेठ येथे युवक काँग्रेसच्या वतीने खड्ड्यात व चिखलात गवत लावून सोलापूर महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या भोंगळ कारभाराचा निषेध करण्यात आला. तसेच ही कामे लवकर पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.