
पंढरपूर – पंढरीचा परमात्मा पांडुरंग हा साक्षात श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो. त्यामुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात वसंत पंचमी ते रंगपंचमी असा एक महिना रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. जगाच्या पाठीवर एक महिना रंगपंचमीचा सण साजरा करणारे श्रीक्षेत्र पंढरपूर हे एकमेव देवस्थान आहे. आज पंढरीत रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आपल्या दैवतावर रंगाची उधळण करण्यासाठी अनेक नागरिकांनी हजेरी लावली होती.
रंगपंचमी सणाच्या निमित्ताने देवाला दररोज पांढरा पोशाख करुन देवाच्या अंगावर केशर व गुलाब पाण्याच्या रंगाची उधळण केली जाते. सलग महिनाभर हा दिनक्रम सुरु असते. या उत्सवाची सांगता रंगपंचमीला होते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांचे हस्ते यमाई तलाव येथे श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन करुन रंगपंचमी सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला यावेळी डीवायएसपी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी आदी उपस्थित होते. श्री विठ्ठल मूर्ती पूजनानंतर डीजे च्या तालावर उपस्थित अबालवृद्धांनी ठेका धरला. या रंगपंचमी सोहळ्यात पंढरपूरकारासह वारकरी भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात.